शहिदाच्या मुलाला सावरताना पोलिसांच्याही भावनांचा बांध फुटला
वडिलांना शेवटचं पाहत त्यांना श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर....
श्रीनगर : अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी अर्शद खान यांच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनाच्या वेळीचे फोटो सोशल मीडियावर साऱ्या देशवासियांच्या काळजात चर्रsss करत आहेत. खान यांच्या मुलाला एक वरिष्ठ पोलीस अधिकारी त्या ठिकाणहून घेऊन जातानाचे हे फोटो आहेत.
जम्मू - काश्मीर पोलिसांनी शेअर केलेल्या या फोटोंमध्ये (एसएसपी)मधील वरिष्ठ पोलीस अधिकारी हासीब मुघल हे खान यांच्या मुलाला त्या ठिकाणहून नेत आहेत. वडिलांना शेवटचं पाहत त्यांना श्रद्धांजली वाहून झाल्यानंतर त्या अवघ्या चार वर्षांच्या मुलाला नेत असताना खुद्द हासीब यांच्याही भावनांचा बांध फुटला.
एक पोलीस अधिकारी असूनही त्यांचा धीटपणा इथे मात्र नाहीसा झाला आणि त्यांच्या भावना दाटून आल्या. कसाबसा त्यांनी हा कठीण प्रसंग मारुन नेला हे फोटो पाहून लगेचच लक्षात येत आहे.
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेला हा फोटो बरंच काही सांगून जात आहे. यात एका पोलीस अधिकाऱ्यापासून एका वडिलांच्या मनातील कालवाकालव स्पष्टपणे पाहता येत आहे.
अनंतनागमध्ये काही दिवसांपूर्वीच झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अर्शद खान हे गंभीररित्या जखमी झाले होते. ज्यानंतर ४० वर्षीय खान यांना उपचारांसाठी दिल्लीला नेण्यात आलं होतं. पण, तिथे त्यांची प्रकृती आणखी खालावली आणि अखेर रविवारी त्यांची प्राणज्योत मालवली. अनंतनाग येथील सदर पोलीस ठाण्यात ते स्टेशन हाऊस ऑफिसर (एसएचओ) या पदावर सेवेत रुजू होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे आणि पालक असं कुटुंब आहे. २००२ मध्ये ते राज्य पोलीस विभागाच्या सेवेत रुजू झाले होते.