Pinwheel Galaxy : ताऱ्यांचा स्फोट कधी तुम्ही पाहिलाय का? पिनव्हील गॅलेक्सीमध्ये सापडला सुपरनोव्हा
Pinwheel Galaxy : सुपरनोव्हा पिनव्हील गॅलेक्सीमध्ये दिसून आला. खगोलप्रेमींमध्ये सध्या या सुपरनोव्हाची फार चर्चा आहे. पिनव्हील गॅलेक्सी Spiral म्हणजेच सर्पिल दिर्घीका आहे.
Pinwheel Galaxy : सध्या खगोलप्रेमींमध्ये चर्चा आहे ती पिनव्हील गॅलेक्सीमध्ये ( Pinwheel Galaxy ) सापडलेल्या सुपरनोव्हाची. SN 2023ixf हा नव्याने शोध लागलेला सुपरनोव्हा होय. हा सुपरनोव्हा पिनव्हील गॅलेक्सीमध्ये दिसून आला. पिनव्हील गॅलेक्सी जी मेसियर 101, किंवा M101 म्हणून देखील ओळखली जाते. पिनव्हील गॅलेक्सी Spiral म्हणजेच सर्पिल दिर्घीका आहे. जी लहान दुर्बिणीद्वारे ही पाहता येते.
सुपरनोव्हाचा शोध
पिनव्हील गॅलेक्सीचे फोटो याआधी अनेकदा घेतले गेले आहेत. मात्र, या गॅलेक्सीमध्ये एक सुपरनोव्हा दिसला. सुपरनोव्हा म्हणजेच मृत पावणारा तारा...म्हणजेच प्रचंड मोठ्या ताऱ्यांचे स्फोट.. हा स्फोट इतका विशाल आणि तेजस्वी असतो की कोट्यवधी प्रकाश-वर्षांपासून देखील पाहिला जाऊ शकतो. SN 2023ixf चा शोध हौशी खगोलशास्त्रज्ञांसाठी एक रोमांचक घटना आहे. सुपरनोव्हा पाहण्याची ही दुर्मिळ संधी आहे. सुपरनोव्हा दिसणं ही संशोधनाची नवी संधी आहे. SN 2023ixf चा अभ्यास करून ताऱ्यांच्या उत्क्रांतीबद्दल अधिक जाणून घेता येईल.
पिनव्हील गॅलेक्सी कुठे आहे?
पिनव्हील आकाशगंगा उर्सा मेजर नक्षत्रामध्ये पृथ्वीपासून २१ दशलक्ष प्रकाश-वर्षे (६.४ मेगापार्सेक) दूर असलेली एक सर्पिल (Spiral Galaxy) दिर्घिका आहे.
नवीन सुपरनोव्हा असलेली पिनव्हील गॅलेक्सी उर्सा मेजर (बिग बेअर) बॉर्टीस समूहातील (Bootes Constellation) द हर्ड्समनपासून विभक्त करणार्या सीमेजवळ आहे.
पिनव्हील गॅलेक्सीमधील सुपरनोव्हाचा शोध कोणी लावला?
एक प्रसिद्ध जपानी हौशी खगोलशास्त्रज्ञ (Amateur Astronomer) कोइची इटागाकीने (Koichi Itagaki) या सुपरनोव्हाचा शोध लावला. कोइची इटागाकी या हौशी खगोलशास्त्रज्ञाने याआधीही अनेक शोध लावले आहेत. जपानमधील यामागाता (Yamagata) येथील त्यांच्या वैयक्तिक वेधशाळेत खगोलसंशोधन करताना त्याला M101 Galaxy मध्ये एक सुपरनोव्हा शोधण्यात यश आले आहे.
कोइची इटागाकी जपानमधील व्हेरिएबल स्टार ऑब्झर्व्हर्स लीग इन जपान (VSOLJ) आणि आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय संघाचे (IAU) मायनर प्लॅनेट सेंटरचा सदस्य आहे. इटागाकीची खगोलशास्त्रातील आवड आणि जिज्ञासू वृत्ती, सातत्य यामुळे तो या क्षेत्रात हे महत्त्वपूर्ण योगदान देऊ शकला. खगोलशास्त्रामध्ये केवळ व्यावसायिक शास्त्रज्ञच (Professional Astronomer) नाही, तर हौशी खगोलशास्त्रज्ञ (Amateur Astronomer) देखील नवनवीन शोध घेऊन शकतात.
स्टारगेझर्स, सज्ज व्हा आणि तुमची दुर्बिणी M101 कडे वळवा. पिनव्हिल दिर्घिकेमधील एका नेत्रदीपक वैश्विक घटनेचे साक्षीदार होण्याची ही संधी गमावू नका.