दिल्लीतील `आप` सरकार अस्थिर करण्याचा कट; पुरावे सापडल्याचा दावा
राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (आप) सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. दिल्ली सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात या कटाचा सरकारला पुरावा मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाचे (आप) सरकार अस्थिर करण्याचा कट रचला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे येत आहे. दिल्ली सरकारमधील सूत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात या कटाचा सरकारला पुरावा मिळाल्याचाही दावा करण्यात आला आहे.
सरकार घेतंय कायदेशीर सल्ला
प्रसारमाध्यमांतील वृत्तात म्हटले आहे की, प्रशासनातील अधिकाऱ्यांचा एक गट दिल्ली सरकार अस्थिर करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. सरकारला तशा स्वरूपाचे पुरावेही मिळाले असून, त्यावर काय तोडगा काढायचा यावर विचार करण्यासाठी सरकार विशेष अभ्यासकांचा कायदेशीर सल्ला घेत आहे. दरम्यान, या पेचप्रसंगावर काही अभ्यासकांचे म्हणने असे की, यावर दोनच उपाय आहेत. पहिला म्हणजे, सर्व पुरावे न्यायालयात सादर करणे व न्याय मिळवणे. दुसरा पर्याय असा की, कटाबाबत जमा असलेलली माहिती आणि पुरावे एलजी किंवा गृहमंत्रालयाकडे सादर करणे.
शासन विरूद्ध प्रसासन संघर्ष
दरम्यान, गेल्या आठवड्यापासून दिल्लीतील 'आप' सरकार आणि प्रशासनातील अधिकारी यांच्यात वाद सुरू आहे. मुख्यमंत्री कार्यालयात मुख्य सचिवाला झालेल्या मारहाण प्रकरणानंतर हा वाद उद्भवला आहे. हे प्रकरण गांभीर्याने घेत प्रशासकीय कर्मचाऱ्यांनी सरकारसोबतच्या बैठकींना दांडी मारण्यास सुरूवात केली असून, कामकाज केवळ कागदोपत्री (लिखित कम्यूनिकेशन) सुरू आहे.
मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेबाबत उत्सुकता
दरम्यान, सरकारी सूत्रांचे म्हणने असे की, सरकार अस्थिर करण्याबाबतच्या कटाचे ठोस पुरावे मिळाले असून, ते गंभीर आहेत. काही अधिकाऱ्यांची ऑडिओ क्लिप मिळाल्याचेही बोलले जात आहे. त्यामुळे या सर्व प्रकारावर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.