मालदीवच्या संसदेत पंतप्रधान मोदी करणार भाषण
दुसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर मोदींचा पहिला परदेश दौरा
नवी दिल्ली : दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर मोदी पहिल्या परदेश दौऱ्यासाठी रवाना होणार आहेत. पहिल्यांदा ते मालदिवच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासोबतच दक्षिण यात्रा आणि पहिली मंदिर यात्राही करतील. मालदिवच्या दौऱ्यासाठी आज रात्री ते दिल्लीहून केरळसाठी रवाना होतील. कोच्चीच्या शासकीय विश्रामगृहात रात्री थांबतील. ८ जूनला केरळच्या गुरुवयूर मंदिरात पूजा करतील. तसंच येथील उत्सवात सहभागी देखील होतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी कोच्चीहून मालदीवसाठी रवाना होतील.
मालदीवच्या संसदेत पंतप्रधान मोदी भाषण देखील करणार आहेत. त्यानंतर ९ जूनला मालदीवहून ते श्रीलंकेसाठी रवाना होतील. त्याठिकाणी पंतप्रधान ईस्टर हल्ल्यानंतर श्रीलंकेला मदतीसाठी संदेश देतील. ९ जूनच्या संध्याकाळी पंतप्रधान कोलंबो येथून थेट आंध्र प्रदेशला जातील. त्याठिकाणी तिरुमला मंदिरात व्यंकटेश्वराची पूजा करतील. त्यानंतर पंतप्रधान दिल्लीत परततील. २०१४ मध्ये पहिल्यांदा सत्तेत आल्यानंतर मोदींनी शेजारी देशांवर लक्ष केंद्रित केलं होतं. सर्वात आधी त्यांनी शेजारी देशाचाच दौरा केला होता.