नवी दिल्ली :  'सबका साथ, सबका विकास' या ध्येयाने आमचे सरकार काम करत आहे, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना जोरदार चिमटा काढला. तुम्ही २०२४ मध्ये पुन्हा अविश्‍वास ठराव दाखल करा, तुम्हाला माझ्या खूप खूप शुभेच्छा आहेत, असे सांगत विरोधकांना पुन्हा सत्तेत येवू देणार नाही, असा इशारा मोदी यांनी अविश्वास ठरावाच्या चर्चेवेळी दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०१९ मध्ये कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष झाला, तर इतरांचे काय होणार याबाबत जरा गोंधळ आहे. ही भाजपची नाही; कॉंग्रेसच्या मित्रपक्षांची 'फ्लोअर टेस्ट' आहे. कॉंग्रेसला त्यांच्या मित्रांची चाचणी घ्यायचीच असेल, तर त्यासाठी सरकारवरील अविश्‍वास ठरावाचा आधार कशाला घेता? मुद्दा असा आहे, कॉंग्रेसचा सरकारपेक्षा स्वत:च्या मित्रांवरच अधिक अविश्‍वास आहे, असा टोला मोदी यांनी लगावला. 


'ज्यांचा स्वत:वरच विश्‍वास नाही, ते सरकारवर काय विश्‍वास ठेवणार', अशा शब्दांत मोदी यांनी विरोधकांच्या एकजुटीची खिल्ली उडविली. अविश्‍वास प्रस्ताव हा लोकशाहीचा महत्त्वाचा भाग आहे. टीडीपीच्या माध्यमातून हा प्रस्ताव आला असला, तरीही त्यांच्याबरोबर असलेल्या इतर काही सदस्यांनीही त्यांची भूमिका मांडली आहे. या चर्चेच्या माध्यमातून देशाला या सभागृहातील नकारात्मकतेचा चेहरा पाहायला मिळाला. विकासाप्रति काही जणांना किती तिटकारा आहे, हेही दिसले. 'अविश्‍वास प्रस्ताव आलाच का', असा प्रश्‍न अनेकांना पडला. संख्या नाही, बहुमतही नाही तरीही प्रस्ताव का आला? चर्चेची तयारीच नव्हती, तर मग प्रस्ताव का दाखल केला? 'अहंकार' हे या मागील कारण आहे. 'मोदी हटाव' हे मुख्य कारण आहे, अशी टिप्पणी मोदी यांनी केली. 


 केंद्र सरकारच्या गेल्या चार वर्षांतील कामाचा पाढा वाचला. 'सबका साथ, सबका विकास' या ध्येयाने आमचे सरकार काम करत आहे. देशाच्या १८  हजार गावांमध्ये वीज पोचविण्याचे काम केलेय.  'जन धन योजने'च्या माध्यमातून आम्ही गरीबांना बॅंकेच्या व्यवस्थेत आणले. तत्कालीन सत्ताधाऱ्यांना सर्वसामान्य जनतेसाठी काहीच करता आले नाही. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आम्ही योजनाबद्ध पावले उचलत आहोत, असे मोदी म्हणालेत.