नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असणाऱ्या दहशतवादी तळांवर हल्ला करत हे तळ उध्वस्त करण्याची महत्त्वाची भूमिका मोदी सरकारच्या काळात भारतीय वायुदलाकडून निभावण्यात आली. पाकिस्तानमध्ये करण्यात आलेल्या याच एअर स्ट्राईकचा फायदा मोदींना झाल्याचं समोर आलं आहे. फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीच नव्हे, तर त्यांच्या मंत्रीमंडळात असणाऱ्या मंत्र्यांची लोकप्रियताही वाढल्याचं या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. मोदींच्या तुलनेत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेच्या आकड्यांमध्ये मात्र घट झाली आहे. 'सीवोटर-आयएनएस स्टेट ऑफ द नेशन ओपिनियन पोल'नुसार, ७ मार्चला जवळपास ५१ टक्के जनतेने आपण केंद्र सरकारच्या कामगिरीने फार समाधानी असल्याची थेट प्रतिक्रिया दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

१ जानेवारीला हा आकडा अवघ्या ३६ टक्क्यांवर होता. त्यानंतर ७ मार्चला मात्र त्याने उसळी घेतल्याचं पाहायला मिळालं. या वर्षी लोकप्रियतेच्या आकड्यांमघध्ये अप्रूवल रेटींगमध्ये ३२ टक्क्यांच्या तुलनेने वाढ झाली असून, हा आकडाही तब्बल ६२ टक्क्यांवर पोहोचला आहे. सीवोटरच्या निवडणूक विश्लेषक यशवंत देशमुख यांनी याविषयीचं विश्लेषण केलं. गेल्या काही काळात महत्त्वाच्या घटना घडल्या. एक म्हणजे केंद्रीय अर्थसंकल्प आणि दुसरं म्हणजे पुलवामा हल्ल्याचं उत्तर म्हणून पाकिस्तानमध्ये भारतीय वायुदलाने केलेला हवाई हल्ला,अर्थात एअर स्ट्राईक. अर्थसंकल्पानंतर लोकप्रियतेच्या आकड्यांमध्ये काही वाढ झाली. पण, एअर स्ट्राईकनंतर मात्र लोकप्रियतेच्या आकड्यांमध्ये लक्षणीय उसळी पाहायला मिळाली अशी माहिती त्यांनी दिली. 


पुलवामा हल्ल्याचा निषेध, त्यानंतर कारवायांना आलेला वेग आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन करण्यात आलेला एअर स्ट्राईक या सर्व गोष्टींमुळे मोदींनाच फायदा झाला असून, त्याचे थेट परिणाम २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवर होणार आहेत. मोदींच्या तुलनेत कुठे राहुल गांधी यांच्या लोकप्रियतेत वाढ होतेय असं भासत असतानाच या आकड्यांमध्ये मात्र घट झाली. नव्या वर्षाच्या सुरुवातीला त्यांची अप्रूवल रेटींग ही २३ टक्क्यांवर होती. पण, पुलवामा, बालाकोट हल्ल्यानंतर मात्र अप्रूवल रेटींग अवघं आठ टक्क्यांवर घसरलं आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत पण, आता लोकप्रियतेच्या या आकड्यांमध्ये फार मोठे बदल होणार नसल्याचं चित्र आहे.