पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेचं अभिनंदन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवतिर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी देशातील अनेक दिग्गज नेते मंचावर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतर त्यांचं अभिनंदन केलं. पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं की, 'मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या उद्धव ठाकरे यांचं अभिनंदन, मला विश्वास आहे की ते महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी काम करतील.' पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील या शपथविधी सोहळ्यासाठी शिवसेनेने आमंत्रण दिलं होतं.
याधी राज्यात शिवसेना-भाजप युतीचं सरकार होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात याआधी अनेकदा भेट झाली. 25 वर्षाहून अधिकचा काळ दोघेही युतीमध्ये होते. पण आज हे पक्ष एकमेकांच्या विरोधात बसणार आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन शिवसेना-भाजपची युती तुटली. दोन्ही पक्षाला बहुमत मिळालं असताना देखील मुख्यमंत्रीपदावर ठाम असल्याने दोन्ही पक्ष आज एकमेकांचे विरोधी झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या शपथविधीला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे देखील उपस्थित होते.
शिवसेना एनडीएमधून ही बाहेर पडली आहे. भाजपचा विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने राज्यात सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रीय पातळीवर शिवसेना मोदी सरकार विरोधात कशा प्रकारे भूमिका घेते हे पाहावं लागेल.