कोणीही आपली एक इंचही जमीन बळकावू शकणार नाही- मोदी
कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही.
नवी दिल्ली: चीनने प्रत्यक्ष नियंत्रण रेषा (LAC) ओलांडून भारतीय हद्दीत घुसखोरी केलेली नाही. तसेच भारताची एकही चौकी चीनच्या ताब्यात गेलेली नाही, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. गलवान खोऱ्यातील भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत ते बोलत होते. यावेळी मोदींनी भारताच्या हद्दीत कोणतीही घुसखोरी झाली नसल्याचे सांगत उपस्थितांना आश्वस्त केले. तसेच सध्याच्या घडीला भारत इतका सामर्थ्यशाली देश आहे की, आपल्या इंच जमिनीकडेही कोणी वाकड्या नजरेने पाहू शकत नाही, असे मोदींनी सांगितले.
गलवान खोऱ्यातील परिस्थितीविषयी शरद पवारांचा मोदी सरकारला महत्त्वाचा सल्ला, म्हणाले...
भारताला मैत्री आणि शांतता हवी आहे. पण देशाच्या सार्वभौमत्वाला आणि अखंडतेला ठेच पोहोचू देणार नाही. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. देशाच्या सुरक्षेसाठी ज्या पायाभूत सुविधांची उभारणी गरजेची आहे, ते काम पूर्वीच्याच वेगाने सुरु राहील, असेही यावेळी मोदींनी सांगितले.
'सरकारमध्ये डोळे काढून हातात द्यायची ताकद', चीनच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांचा मोदींना पाठिंबा
सीमारेषेवर चीनने जे काही कृत्य केले आहे त्यामुळे देशात संतापाची भावना आहे. तुम्ही (विरोधकांनी) सगळ्यांनी बैठकीत ही भावना वारंवार बोलून दाखविली आहे. मी तुम्हाला आश्वस्त करु इच्छितो की, देशाच्या सुरक्षेत आपल्या लष्कराकडून कोणतीही कसर सोडली जाणार नाही. सैन्य तैनात करणे असो, कारवाई असो, प्रतिहल्ला असो, आकाश किंवा पाण्यातली लढाई असो आपले लष्कर देशाच्या सुरक्षेसाठी सर्वकाही करेल. कुठल्याही परकीय दबावापुढे भारत झुकणार नाही. कुठल्याही हल्ल्याला उत्तर देण्यासाठी सैन्याला मोकळीक देण्यात आली आहे, मोदी म्हणाले.