मी दहशतवाद आणि गरीबी संपवण्याचा प्रयत्न करतोय- पंतप्रधान
कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते.
नवी दिल्ली : विरोधक मला हटवण्याचा प्रयत्न करतायत आणि मी दहशतवाद आणि गरीबी संपवण्याचा प्रयत्न करतोय असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कर्नाटकातील कलबुर्गी येथे झालेल्या सभेमध्ये ते बोलत होते. ज्या व्यक्तीला 125 कोटी व्यक्तींचा आशीर्वाद असेल त्याला कोणाला घाबरण्याची गरज आहे का ? असा प्रश्न विचारत मग तो हिंदुस्थानी असो किंवा पाकिस्तानी, चोर असो वा बेईमान यांना घाबरायला हवे का ? असा प्रश्नही त्यांनी विचारला. भारत आणि 125 कोटी जनतेने ही ताकद मला दिली आहे.
26 फेब्रुवारीला पाकिस्तानी दहशतवाद्यांच्या तळावर भारतीय जवानांनी हल्ला चढवला. याचा दाखलाही पंतप्रधानांनी आपल्या भाषणात दिला. जग नव्या प्रकारच्या धाडसाचा साक्षीदार बनतोय. हे धाडस एकट्या मोदींचे नाही तर भारताच्या 125 कोटी लोकांचे आहे. महागठबंधन हे महामिलावट असल्याची टीका पंतप्रधानांनी केली. देशाला मजबूत सरकारची गरज असल्याचेही ते म्हणाले.
कर्नाटकातील मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी हे रिमोट वर चालणारे मुख्यमंत्री असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कॉंग्रेस-जद (एस) गठबंधन लोकांच्या पाठीत सुरा खुपसत असल्याचे सांगत इथले राज्य सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचे ते म्हणाले. पंतप्रधान शेतकरी सन्मान योजना लागू करण्यासाठीही इथले सरकार सहकार्य करत नसल्याचे ते म्हणाले. राज्य सरकार जर या योजनेच्या मध्ये येत असेल तर शेतकरी त्यांनी उद्धस्त करतील असे ते म्हणाले. पूर्वेचा विकास हा आमच्या सरकारची प्राथमिकता असल्याचेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.