देशातील पहिल्या `अंडरवॉटर मेट्रो` मार्गाचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन, तिकीटाचे दर काय?
Underwater Metro : शहरी वाहतुकीच्या नवीन युगातील एक पाऊल टाकत भारत पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे अंडरवॉटर पहिली मेट्रो सुरू करण्यात आली. या मेट्रोचा मार्ग कोणता असणार आहे. तसेच त्याचे तिकीटाचे दर किती असतील जाणून घ्या...
Underwater Metro News In Marathi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (6 मार्च 2024 ) कोलकाता येथे भारतातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रो मार्गाचे उद्घाटन केले. पायाभूत सुविधांच्या विकासाकडे देशाचा कल दर्शवणारा हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहा नवीन मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवून कोलकतामधील अंडरवॉटर मेट्रोमधून विद्यार्थ्यांसोबत प्रवास केला आहे.
दरम्यान कोलकातामधील हावडा मैदान ते एस्प्लेनेड या दोन स्थानकांमधील बोगद्याची एकूण लांबी 4.8 किलोमीटर आहे. यामध्ये 1.2 किमीचा बोगदा हुगळी नदीच्या 30 मीटर खाली आहे. भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन हावडा मेट्रो स्थानक असणार आहे. 2023 मध्ये हुगळी नदीच्या पात्राखाली चाचणी प्रवास पूर्ण झाल्यावर कोलकाता मेट्रोने एक मैलाचा दगड गाठला. आज भारताला पहिली अंडरवॉटर मेट्रो मिळाली असून भारतातील नदीखालचा पहिला बोगदा वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. हा बोगदा पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉर प्रकल्पाचा एक भाग असून जो सेक्टर पाचपासून सुरू होतो आणि सध्या सियालदह येथे संपतो. मेट्रो रेल्वेच्या म्हणण्यानुसार 1971 मध्ये शहराच्या मास्टर प्लॅनमध्ये या कॉरिडॉरची ओळख झाली होती. को "हावडा आणि कोलकाता ही पश्चिम बंगालची दोन शतके जुनी ऐतिहासिक शहरे आहेत आणि हा बोगदा या दोन शहरांना हुगळी नदीखाली जोडेल," असे मेट्रो रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कौशिक मित्रा यांनी सांगितले.
तसेच अंडरवॉटर मेट्रो उभारणीसाठी आठ हजार कोटींहून अधिक खर्च करण्यात आला आहे. हावडा आणि कोलकाता यांना जोडणाऱ्या अंडरवॉटर मेट्रोमध्ये सहा स्थानके असून त्यापैकी तीन भूमिगत असणार आहेत. तर हावडा मैदान, हावडा स्टेशन कॉम्प्लेक्स आणि बीबीडी बाग (महाकरण) ही स्थानके अंडरवॉटर असतील. या मेट्रोची स्थानके आणि गाड्या वातानुकूलित आहेत आणि बोगदा नैसर्गिकरित्या आपत्कालीन पंख्यांसह वातानुकूलित आहेत. बोगद्याचा तळ नदीच्या पृष्ठभागापासून 26 मीटर खाली आहे आणि गाड्या नदीच्या तळापासून 16 मीटर खाली धावतील. सर्वात रुंद मेट्रो स्टेशन हावडा स्टेशन आहे, जे 33 मीटर रुंद आहे. मेट्रो अंदाजे 45 सेकंदात नदीपात्रातील 520 मीटरचे अंतर पार करेल. एअरटेलने मेट्रो प्रवाशांना अखंड कनेक्टिव्हिटी देण्याची योजना जाहीर केली आहे. दूरसंचार कंपनी हुगळी नदीच्या काठावर 35 मीटर मोफत उच्च क्षमतेचा नोड उभारणार आहे.
या मेट्रोच्या तिकीटाचे दर किती?
अंडरवॉटर मेट्रोचा प्रवास करण्यासाठी तिकीटाची किंमत 5 रुपयांपासून सुरू होते आणि स्टेशनच्या अंतरानुसार 50 रुपयांपर्यंत जाऊ शकते. पहिल्या दोन किलोमीटरचे भाडे पाच रुपये; मग ते 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये, 25 रुपये आणि असेच 50 रुपयांपर्यंत वाढणार आहे.
अंडरवॉटर मेट्रोची वैशिष्ट्ये
- हुगळी नदीखालून 32 मीटर खाली अंडरवॉटर मेट्रो धावणार.
- हुगळी नदीखालील 520 मीटरचे अंतर 45 सेकंदात मेट्रो पूर्ण करता येणार.
- 4.8 किलोमीटरचा हा भाग पूर्व-पश्चिम मेट्रो कॉरिडॉरला महत्त्वाचा बनवतो.
- 16.5 किमी लांबीच्या मेट्रो मार्गापैकी 10.8 किमी भूमिगत आहे.
मेट्रोमधील वैशिष्ट्ये
या मेट्रोमध्ये ऑटोमॅटिक ट्रेन ऑपरेशन सिस्टीम (ATO) बसवण्यात आली आहे. मोटरमनने बटण दाबताच गाडी आपोआप पुढच्या स्थानकावर जाईल. कोलकाता मेट्रोचे लक्ष्य जून किंवा जुलैच्या आसपास सॉल्ट लेक सेक्टर वी आणि हावडा मैदान दरम्यानच्या संपूर्ण पूर्व-पश्चिम मार्गावर व्यावसायिक ऑपरेशन सुरू करण्याचे आहे.