रायबरेली: पंतप्रधान नरेंद्र मोदी जातील तेथे द्वेष पसरवतात. हिंदू-मुस्लीम, हिंदू-शीख अशा लढाया लावून देतात. गुजरातमध्ये असल्यावर उत्तर भारतीयांना पळवून लावा सांगतात. त्यामुळे तिरस्काराचं दुसरं नाव म्हणजे नरेंद्र मोदी असल्याची जळजळीत टीका काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ते गुरुवारी रायबरेली येथील जाहीर सभेत बोलत होते. यावेळी त्यांनी राफेल, नोटाबंदी, जीएसटी, बेरोजगारी आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी आदी मुद्द्यांवरून मोदी सरकारवर चौफेर टीका केली. मी नरेंद्र मोदी यांना सांगू इच्छितो की, द्वेष पसरवून काही साध्य होणार नाही. कारण त्यामुळे फक्त विनाश होतो. सध्या मोदी म्हणजे तिरस्काराचं मूर्तीमंत स्वरूप झाले आहेत. आपण त्यांना पंतप्रधानपदावरून दूर करणार आहोत आणि कोणीही आपल्याला अडवू शकत नाही, असे राहुल यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजप सरकार सत्तेवर आले तेव्हा सुरुवातीच्या काळात 'अच्छे दिन आयेंगे', अशा घोषणा ऐकू यायच्या. मात्र, आता 'चौकीदार चोर है'च्या घोषणा ऐकायला मिळतात. नोटाबंदी हा भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा होता. त्यामुळे सामान्य जनतेला कित्येक दिवस रांगेत उभे राहावे लागले. प्रभावशाली व्यक्ती याला अपवाद होत्या. उर्वरित निष्पाप आणि कष्टकरी जनता यामध्ये भरडली गेली, अशी टीकाही राहुल यांनी केली. 



याशिवाय, बेरोजगारीच्या मुद्द्यावर भाष्य करताना राहुल यांनी शेजारच्या चीनचे उदाहरण दिले. त्यांनी म्हटले की, चीनमध्ये प्रत्येक २४ तासांमध्ये ५० हजार रोजगार निर्माण होतात. मात्र, भारतात हीच संख्या ४५० इतकी आहे. वस्तू व सेवा कर (जीएसटी) एकाच दराने आकारला जावा, अशी मागणी आम्ही केली होती. मात्र, केंद्र सरकारने पाच प्रकारचे कर लादले. यामुळे देशातील लघुद्योग नष्ट झाले, असे राहुल गांधी यांनी सांगितले.