Lakshadweep - Maldives Row : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी नुकतीच लक्षद्वीपला भेट दिली. ज्यानंतर त्यांच्या या भेटीदरम्यानचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. इथं पंतप्रधानांचे फोटो चर्चेत आले आणि तिथं एका नव्या वादानं डोकं वर काढलं आणि मालदीवमधील नेतेमंडळींनीही या वादात उडी मारली. या साऱ्यामध्ये लक्षद्वीपबद्दलचं कुतूहल कमालीचं वाढलं. 32.62 चौरस फूटांचं क्षेत्रफळ असणारं हे बेट नेमकं भारताचा भाग आणि एक केंद्रशासित प्रदेश कसं झालं याबद्दल अनेकांनाच प्रश्न पडला आणि अखेर या प्रश्नाचं उत्तरही समोर आलं. 


मुस्लीम बहुल भाग 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लक्षद्वीप हा भारतातील एक सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश असून, भारताच्या पश्चिम किनारपट्टी भागापासून या बेटापर्यंतचं अंतर साधारण 200 ते 440 किमी इतकं आहे. एकदोन नव्हे तब्बल 36 बेटांपासून तयार झालेल्या या लक्षद्वीपवरील फक्त 10 बेटांवरच मानवी वस्ती आहे. इथं 96 टक्के लोकसंख्या मुस्लीम असून, या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी आहे कवरत्ती. भारतातील अनेक राज्यांहून इथं सर्वाधिक, म्हणजेच 91.82 टक्के साक्षरता आहे. 


...आणि भारताचा भाग झालं लक्षद्वीप 


लक्षद्वीपचं भारताशी असणारं नातं उलगडण्यासाठी 1947 मध्ये डोकावूया, हा तोच काळ होता जेव्हा भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली होती. भारताचे तत्कालीन गृहमंत्री आणि उप पंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांनी 500 हून जास्त संस्थानांना एकत्र आणण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यावेळी पाकिस्तानचे तत्कालीन प्रधानमंत्री लियाकत अली खान यांनी बंगाल, सिंध, पंजाब आणि हजाराला पाकिस्तानचा भाग करण्यासाठी बरेच प्रयत्न केले पण, कोणाचंही लक्ष लक्षद्वीपकडे गेलं नाही. मुळात स्वातंत्र्यानंतर या भागावर कोणाचाही अधिकार नव्हता. सरतेशेवटी मुस्लीम बहुल लक्षद्वीपला पाकिस्तानचा भाग करण्यासाठीच्या हालचाली सुरु झाल्या आणि भारतातही त्यावर विचार, चर्चा सुरु झाल्या. तितक्यातच पाकिस्ताननं या भागामध्ये युद्धनौका पाठवल्या. 


हेसुद्धा वाचा : WhatsApp ची 'ही' मोफत सेवा बंद; आता दर महिन्याला मोजावे लागणार पैसे 


इथं पटेल यांनी आरकोट रामास्वामी मुदालियर आणि आर्कोट लक्ष्मणस्वामी मुदालियर यांना लष्करासह लक्षद्वीपच्या दिशेनं कूच करण्यास सांगत तिथं भारतीय राष्ट्रध्वज फडकवण्याच्या सूचना केल्या. पाकिस्तानची युद्धनौका तिथं पोहोचण्यापूर्वीच भारताचा तिरंगा या भागात फडकत होता, त्या क्षणापासून लक्षद्वीप भारताचा अविभाज्य भाग असल्याचं सांगितलं जातं. 


देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 नोव्हेंबर 1956 मध्ये लक्षद्वीपला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला. त्यावेळी या भागाला लक्कादीव-मिनिकॉय-अमिनीदिवि म्हणून संबोधलं जात होतं. अखेर 1 नोव्हेंबर 1973 मध्ये त्याला लक्षद्वीप हे नाव देण्यात आलं.