WhatsApp Update : तंत्रज्ञानात दर दिवशी काही असे नवे बदल केले जात आहेत ज्यामुळं स्पर्धा तर वाढली आहेच, पण युजर्सही सातत्यानं स्वत:ला अपडेट करु पाहत आहेत. याच टेकसॅव्ही जगामध्ये काही अॅप्स मात्र गेल्या बऱ्याच काळापासून पाय घट्ट रोवून उभे आहेत. यामधील एक अॅप म्हणजे व्हॉट्सअप. जगात दर दिवशी अब्जोंच्या संख्येनं युजर्स हे अॅप वापरतात.
मेसेजिंग करणं, फोटो आणि व्हिडीओ शेअर करणं किंबहुना पैशांची आणि विविध Documents ची देवाणघेवाण करणं अशा अनेक कामांसाठी हे अॅप वापरलं जातं. व्हॉट्सअप वापरणारी अनेक मंडळी त्यांचे फोटो, व्हिडीओ आणि अॅपमधील इतर माहितीचा बॅकअप गुगल बॅकअपमध्ये Save करतात. पण, आता हीच बॅकअप सुविधा फार काळ मोफत वापरता येणार नाही. थोडक्यात आता ही सुविधा वापरण्यासाठी युजर्सना पैसे मोजावे लागणार आहेत. (WhatsApp will charge for this feature latest tech news )
2023 च्या अखेरीस गुगल सपोर्टकडून महत्त्वाची माहिती देत व्हॉट्सअपमध्ये येत्या काळात काही महत्त्वाचे बदल होणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्या माहितीनुसार आता युजर्स गुगल ड्राईव्हवर मोफत स्वरुपात कोणतीही माहिती, अनलिमिटेड चॅट सेव्ह करू शकत नाहीत. स्पेस पूर्ण झाल्यानंतर युजर्सना क्लाऊड स्टोरेजसाठी पैसे द्यावे लागतील किंवा त्यांना काही डेटा डिलीट करावा लागणार आहे. व्हॉट्सअपकडूनही ही नवी अपडेट लागू करण्यासाठीची तयारी सुरु करण्यात आली आहे.
Google Drive वर युजर्सना साधारण 15 जीबी क्लाऊड डेटा अॅक्सेस मिळतो. सध्या व्हॉट्सअपकडून कितीही बॅकअप केला तरीही 15GB फ्री डेटाला धक्काही पोहोचत नाही. पण, नव्या वर्षात हा नियम बदलणार आहे. पण, नेमका कधी हे मात्र अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही. थोडक्यात जर व्हॉट्सअप युजर्स अधिकाधिक बॅकअप क्लाऊड स्टोरेजमध्ये सेव्ह करत आहेत तर, तो 15GB डेटा मध्ये मोजला जाणार आहे. त्यामुळं आता तुम्हाला डेटा मॅनेज करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागणार असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
गुगलकडून (google) तुम्हाला जास्तीचा स्टोरेज हवा असल्यास गरजेनुसार स्टोरेज प्लॅन निवडता येणार आहे. प्रति महिना आणि प्रति वर्ष अशा दोन विभागांमध्ये हा प्लॅन असून, दोन्ही गटांमध्ये 3 पर्याय उपलब्ध आहेत. जिथं मंथली बेसिक प्लॅनमध्ये 100 जीबी डेटा मिळणार असून, त्यासाठी 35 रुपये भरावे लागणार आहेत. तीन महिन्यांसाठी हा प्लॅन लागू असेल. त्यानंतर प्रति महिना 130 रुपये भरावे लागणार आहेत.