नवी दिल्ली: रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी सोमवारी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर राजकीय व आर्थिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून भविष्यात आम्हाला उर्जित पटेल यांची खूप मोठी उणीव जाणवेल, असे सांगितले. डॉ. उर्जित पटेल हे अत्यंत प्रतिभावान अर्थतज्ज्ञ होते. त्यांना व्यापक अर्थशास्त्रीय समस्यांची खोलवर जाण होती. त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेला एक विशिष्ट दिशा दिली, असे कौतुकौद्गार मोदींनी काढले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उर्जित पटेल हे रिझर्व्ह बँकेचे २४ वे गव्हर्नर होते. रघुराम राजन पायउतार झाल्यानंतर सप्टेंबर २०१६ मध्ये पटेल यांच्याकडे तीन वर्षांसाठी गव्हर्नरपदाची सूत्रे सोपवण्यात आली होती. २०१९ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार होता. मात्र, गेल्या काही काळापासून रिझर्व्ह बँक आणि अर्थमंत्रालयातील उच्चपदस्थांमध्ये सातत्याने खटके उडत होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रिय आर्थिक निर्णय घेण्याच्या नादात सरकार देशाच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटत असल्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर अर्थमंत्रालय आणि रिझर्व्ह बँकेच्या अधिकाऱ्यांमध्ये वाकयुद्धच पेटले होते. अखेर १९ नोव्हेंबरला रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापकीय मंडळाच्या झालेल्या बैठकीत यावर तात्पुरता तोडगा काढण्यात आला होता. मात्र, उर्जित पटेल यांनी आज अचानक राजीनामा देत सर्वांनाच धक्का दिला. 




उर्जित पटेल यांनी आपण वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचे सांगितले असले तरी यामुळे अनेक चर्चांना उधाण आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी काम करायला मिळणे ही माझ्यासाठी भूषणावह आणि सन्मानाची बाब होती. गेल्या काही काळात रिझर्व्ह बँकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मेहनतीमुळेच संस्थेला आपल्या उद्दिष्टे पूर्ण करता आली. त्यासाठी मी रिझर्व्ह बँकेतील सहकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानतो. भविष्यातही रिझर्व्ह बँकेने अशाप्रकारे वाटचाल सुरु ठेवावी, अशा शुभेच्छा यावेळी उर्जित पटेल यांनी दिल्या.