`समुद्रातील द्वारका पाहून मला...`; भगव्या कुर्त्यात मोर पिसांसहीत स्कूबा डायव्हिंगनंतर मोदींची प्रतिक्रिया
Modi Comment After Visiting Underwater Dwarka City: पंतप्रधान मोदी हे गुजरात दौऱ्यावर असून त्यांनी चक्क स्कूबा डायव्हिंग करत समुद्रात बुडालेल्या द्वारका शहराला भेट दिली. मागील महिन्यातच त्यांनी लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंग केलं होतं. त्यानंतर काही आठवड्यांमध्ये पुन्हा मोदींनी समुद्रात जाऊन देव दर्शन घेतल्याचं पाहायला मिळत आहे.
जानेवारी महिन्यात लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंगचाही आनंद घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज स्कूबा डायव्हिंग केलं. विशेष म्हणजे थेट भारतीय पारंपारिक पोशाखामध्ये स्कूबा डायव्हिंग करत पंतप्रधान समुद्राच्या तळाशी असलेली द्वारका पाहण्यासाठी पोहोचले. पंतप्रधान मोदींनीच त्यांच्या एक्स (ट्वीटर) अकाऊंटवरुन या द्वारका भेटीचे फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
मोदींनीच शेअर केले फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. याच दौऱ्यादरम्यान त्यांनी द्वारकाधिश्वर मंदिराला भेट दिली. मनोभावे पुजा केल्यानंतर पंतप्रधान थेट समुद्राच्या तळाशी बुडालेल्या द्वारका शहराचं दर्शन घेण्यासाठी स्कूबा डायव्हिंग केलं. मोदींनीच हे फोटो शेअर केले. मोदींनी 'जय द्वारकाधीश' म्हणत मंदिरामध्ये श्रीकृष्णाचं दर्शन घेतल्याचे फोटो शेअर केले आहेत. मोदींनी द्वारकाधीश्वर मंदिरामध्ये श्रीकृष्णाची मनोभावे पुजाही केली. पंतप्रधानांनी केवळ मंदिरातमध्ये जाऊन दर्शनच घेतलं असं नाही तर ते समुद्राच्या तळाशी असलेल्या द्वारकेच्या मंदिराचंही दर्शन घेऊन आले.
पुरातन काळाशी कनेक्ट झालो
समुद्रामध्ये स्कूबा डायव्हिंग केल्याचे फोटो शेअर करत मोदींनी हा अनुभव दैवी होता असं म्हटलं आहे. "पाण्याखाली असलेल्या द्वारका शहरामध्ये प्रार्थना करण्याचा अनुभव फारच दैवी होता," असं म्हणत मोदींनी समुद्रामध्ये स्कूबा डायव्हिंग केल्याचे फोटोही पोस्ट केलेत. "समुद्रात द्वारकेच्या दर्शनाच्या वेळी मी पुरातन काळाशी कनेक्ट झाल्यासारखं मला वाटलं. श्री कृष्णाची आपल्या साऱ्यांवर अशीच कृपा कायम राहू देत," असंही पंतप्रधानांनी म्हटलं आहे.
भारतीय पोशाखात स्कूबा डायव्हिंग
समुद्रातील द्वारकेच्या दर्शनासाठी जाताना पंतप्रधानांनी भगव्या रंगाचा कुर्ता म्हणजेच पारंपारिक भारतीय पोशाख केला होता. कृष्णाचं प्रतिक असलेलं मोराच्या पिसंही मोदींनी सोबत नेल्याचं फोटोंमध्ये दिसत आहे.
जानेवारीत लक्षद्वीपला जाऊन आले मोदी
जानेवारी महिन्यातच लक्षद्वीपमध्ये स्कॉनर्कलिंगनंतर पंतप्रधान मोदींनी अशाप्रकारे सोशल मीडियावर फोटो शेअर केले होते. त्यावेळेस मोदींनी, 'हा अनुभव फारच थरारक आणि आनंद देणारा आहे', फोटो कॅप्शनमध्ये म्हटलं होतं. लाइफ जॅकेट घालून समुद्रातून बाहेर येताना पंतप्रधान मोदींचा लक्षद्वीपमधील फोटो चर्चेचा विषय ठरला होता. यावेळेस मोदींनी लक्षद्वीपच्या सुंदर समुद्रकिनारी वॉकचाही आनंद घेतला होता. लक्षद्वीपमधील काही फोटोंमध्ये पंतप्रधान मोदी समुद्रकिनाऱ्यावर खुर्चीवर बसून अथांग समुद्र न्याहाळताना, वाचन करताना पाहायला मिळाले होते.