Delhi BJP Office: `2 ते 303 जागा` म्हणत मोदींनी काँग्रेसला करुन दिली शिख दंगलीची आठवण! म्हणाले, `1984 च्या दंगलींनंतर...`
PM Modi reminds Congress of 1984 anti Sikh riots: पंतप्रधान मोदी आज नवी दिल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयाच्या विस्ताराच्या कार्यक्रमामध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना बोलत होते. त्यांनी यावेळेस अनेक ऐतिहासिक संदर्भ दिले.
Modi Reminds Congress Anti Sikh Riots: भारतीय जनता पार्टीच्या मुख्य कार्यालयाच्या (Delhi BJP Office) विस्ताराचा लोकार्पण सोहळा आज नवी दिल्लीमध्ये पार पडला. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) उपस्थित होते. यावेळेस पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणाआधी या कार्यालयाचं बांधकाम करणाऱ्या सर्व कामगारांची भेट घेतली. यावेळी मोदींबरोबर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुरली मनोहर जोशी यासारखे मान्यवर उपस्थित होते. या सर्वांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि धार्मिक विधी पार पडल्या.
2 खासदारांपासून 303 पर्यंत...
या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. कार्यालयाचा विस्तार होत असल्याबद्दल समाधान व्यक्त करतानाच कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. या सर्व विस्तार आणि प्रगतीचा आत्मा हा कार्यकर्ताचा आहे. हा विस्तार केवळ कार्यालयाचा नसून एका सामान्य कार्यकर्त्याच्या स्वप्नांचा विस्तार आहे. मोदींनी जनसंघाच्या स्थापनेचा उल्लेख केला. जनसंघाची सुरुवात झाली होती तेव्हा दिल्लीमधील अजमेरी गेटजवळ एक छोटं कार्यालय होतं. त्यावेळी देशासाठी मोठी स्वप्नं पाहणारा छोटा पक्ष अशी आमची ओळख होती, असं मोदींनी सांगितलं. आम्ही आणीबाणीच्या कालावधीमध्ये स्वत:च्या पक्षाची आहुती दिली, असं मोदी म्हणाले. तसेच 2 खासदारांपासून सुरुवात करणारा हा पक्ष आज (2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये) 303 जागांपर्यंत पोहचलेला पक्ष आहे.
1984 च्या दंगलीचा उल्लेख
आपल्या भाषणामध्ये पंतप्रधान मोदींनी, "1984 च्या दंगलींनंतर झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला मोठं बहुमत मिळालं. त्यावेळीचं वातावरण हे भावनिक पार्श्वभूमीमुळे भारावून गेलेलं वातावरण होतं. त्या वादळात आम्ही जवळजवळ संपलो होतो. मात्र आम्ही आशा सोडली नाही. आम्ही तळागाळात जाऊन काम केलं, संघटना मजबूत केली," अशी आठवण सांगितली. घराणेशाहीवरुनही मोदींनी टीका केली. कुटुंबांकडून चालवले जाणारे पक्ष असताना भाजपा हा असा पक्ष आहे जो तरुणांना पुढे जाण्याची संधी देतो. आज भाजपाच्या पाठीशी देशातील मातांचे आणि बहिणींचे आशीर्वाद आहेत. भाजपाची ओळख केवळ जगातील सर्वात मोठा पक्ष अशी नसून भविष्याचा विचार करणारा पक्ष अशी असल्याचंही मोदी म्हणाले.
हा खडतर प्रवास
काही दिवसांवर आलेल्या भाजपाच्या 44 व्या स्थापना दिवसाचाही संदर्भ मोदींनी दिला. "काही दिवसांनी आपला पक्ष 44 वा स्थापना दिवस साजरा करणार आहे. हा प्रवास अथक आहे. हा प्रवास म्हणजे प्रयत्नांची पराकाष्ठा आहे. कार्यकर्त्यांनी केलेलं समर्पण आणि संकल्पांचं सर्वोच्च शिखर गाठण्याचा हा प्रवास होता. हा प्रवास म्हणजे विचार आणि विचारधाराचे झालेला विस्तार दर्शवणारा आहे," असंही मोदी म्हणाले.
...म्हणून करण्यात आला विस्तार
भाजपाच्या कार्यालयाचा विस्तार करण्यात आला आहे. राष्ट्रीय स्तरावर काम करणारा एखादा कार्यकर्ता दिल्लीमध्ये काही कामानिमित्त आला तर त्याच्या राहण्याची व्यवस्था या ठिकाणी होऊ शकते. तसेच भाजपाच्या कार्यालयाचं भूमीपूजन आज करण्यात आलं. दिल्ली भाजपाचं कार्यालय हे भाजपाच्या केंद्रीय कार्यालयापासून अगदी हाकेच्या अंतरावर उभं राहणार आहे.