Ghulam Nabi Azad Slams Congress: जम्मू-काश्मीरमधील डेमोक्रेटिक प्रोग्रेसिव्ह आझाद पार्टीचे (डीपीएपी) अध्यक्ष आणि काँग्रेसचे माजी नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं (PM Modi) कौतुक केलं आहे. पंतप्रधान मोदींनी नेहमीच मी केलेली टीका सहजपणे स्वीकारल्याचं आझाद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे. इतकच नाही तर आझाद यांनी आपल्या आधीच्या पक्षावरही टीका केली आहे. भाजपाबरोबर आझाद यांची जवळीक वाढत असल्याच्या मुद्द्यावरुन टीका करणाऱ्यांनाही त्यांनी उत्तर दिलं आहे.


मोदींचं कौतुक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी माझ्यासाठी कायम उदार राहिले असं आझाद यांनी म्हटलं. आपण विरोधी पक्षनेता असताना अनेकदा त्यांना कोंडीत पकडलं पण त्यांनी कधीही याचा सूड घेतला नसल्याचा उल्लेख आझाद यांनी केला. "मी पंतप्रधान मोदींसाठी जे काही केलं त्यासाठी ते कायम माझ्यासाठी उदार राहिले. याचं श्रेय पंतप्रधान मोदींनाच दिलं पाहिजे. विरोधी पक्षाचा नेता म्हणून मी त्यांना कोणत्याच मुद्द्यावरुन सूट दिली नव्हती. अगदी कलम 370 असो किंवा सीएए असो किंवा हिजाबचा मुद्दा असो. मी काही प्रस्ताव पूर्णपणे मागे घ्यायला लावले. मात्र त्यांनी एका समजूतदार राजकारण्याप्रमाणे ते स्वीकारलं आणि त्याचा सूड त्यांनी घेतला नाही," असं आझाद यांनी म्हटलं आहे. 


आम्ही भाजपाचे प्रवक्ते असतो तर...


गुलाम नबी आझाद आणि जी-23 बरोबर भाजपाची जवळीक वाढत असल्याच्या आरोपालाही डीपीएपीच्या अध्यक्षांनी उत्तर दिलं आहे. "(आमची जवळीक वाढतेय) असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. जर मी जी-23 समूह भाजपाचे प्रवक्ते असतो तर त्या गटातील सदस्यांना काँग्रेसचे खासदारकी का दिली? या गटातील लोकांना खासदार, महासचिव आणि पदाधिकारी पदाची जबाबदारी का दिली? मी एकटाच आहे ज्याने पक्षातून बाहेर पडून पक्ष स्थापन केला. बाकी लोक अजूनही तिथेच (काँग्रेसमध्येच) आहेत. ही चुकीची भावना असून ती अपरिपक्वता असून हा आरोप बालीशपणा दर्शवतो," असं आझाद म्हणाले.


काँग्रेसवर साधला निशाणा


आझाद यांनी काँग्रेसवरही टीका केली. "काँग्रेसला उघडं पाडण्याचा आणि संपवण्याचा माझा विचार नाही. पक्षाचं नेतृत्व आणि माझे काही मतभेद असतील. मात्र काँग्रेस पक्षाच्या विचारधारेबरोबर माझे मतभेद नाहीत. माझा काँग्रेसच्या विचारधारेशी किंवा आधीच्या काँग्रेस नेतृत्वाशी कोणतेही मतभेद नव्हते. मी माझ्या पुस्तकामध्ये नेहरुंच्या वेळी, इंदिरा गांधींच्या वेळी आणि राजीव गांधींच्या वेळी नेमकं काय चुकलं याचा स्पष्टपणे उल्लेख केला आहे. मात्र त्याचवेळी ते फार मोठे नेते होते, असंही मी म्हटलंय. नेहरुजी, राजीव गांधी, इंदिरा गांधी आघात सहन करु शकत होते. त्यांच्यात तेवढी ताकद होती. त्यांना जनतेचा पाठिंबा होता. त्यांचा सन्मान केला जायचा. आपल्या कामाच्या जोरावर परिस्थिती बदलण्याची धमक त्यांच्यात होती. मात्र सध्याच्या काँग्रेस नेतृत्वाचा लोकांवर प्रभाव नाही," असं आझाद म्हणाले.


मागील वर्षी काँग्रेसला सोडचिठ्ठी


मागील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये ऑगस्ट महिन्यात काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला. पक्ष स्थापन केल्यापासून आझाद यांच्या पक्षात अंतर्गत वाद सुरु आहे.