`राज्यघटनेवर विश्वास असलेला दुसऱ्या देशाचा व्यक्ती नागरिकत्व घेऊ शकतो`
युवा वर्गात सीएए कायद्याबाबत गैरसमज पसरवण्यात आलेत ते दूर करणं गरजेचं आहे असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : भारतीय राज्यघटनेवर विश्वास असलेला दुसऱ्या देशाचा कोणताही व्यक्ती भारताचं नागरिकत्व घेऊ शकतो. सीएए नागरिकत्व काढून घेणारा नाही तर नागरिकत्व देणारा कायदा आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज बेलूर इथल्या मठात म्हटले आहे. युवा वर्गात सीएए कायद्याबाबत गैरसमज पसरवण्यात आलेत ते दूर करणं गरजेचं आहे असं पंतप्रधानांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रामकृष्ण मिशनच्या बेलूर मठाला भेट दिली. या मठाची स्थापना स्वामी विवेकानंद यांनी केली होती. आज स्वामी विवेकानंद यांची जयंती आहे. हा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून साजरा केला जातो. आज बेलूर मठात युवा परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. त्या परिषदेत पंतप्रधान सहभागी झाले होते.
१० जानेवारीपासून लागू
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा (CAA) आणि NRC विरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान केंद्रीय गृहमंत्रालयानं हे विधेयक लागू करण्याविषयी शुक्रवारी नोटिफिकेशन काढले. १० जानेवारीपासून नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ देशभरात लागू करण्यात आल्याचं या नोटिफिकेशनमध्ये म्हटलं गेलंय.
एका गॅझेट अधिसूचनेद्वारे, नागरिकत्व सुधारणा कायद्याची अंमलबजावणी देशभरात केली जात असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलंय. 'नागरिकत्व सुधारणा कायदा २०१९ (२०१९ चं ४७) च्या कलम १ चं उप-कलम (२) नुसार प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करत केंद्र सरकार १० जानेवारी २०२० ही तारीख अधिनियमांचे प्रावधान प्रभावी होण्यासाठी निश्चित करत आहे' असं या अधिसूचनेत म्हटलं गेलंय.