पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड असूनही लोकांनी भाजपला पुन्हा निवडून दिले- मोदी
देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा हा पहिलाच अनुभव होता.
नवी दिल्ली: हल्लीच्या काळात दर पाच वर्षांनी सरकार बदलण्याचा ट्रेंड आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात पुन्हा एकदा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येणे, हे भाजपच्यादृष्टीने मोठे यश म्हणावे लागेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याच्या पार्श्वभूमीवर मोदींनी दिल्लीतील भाजप मुख्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी महाराष्ट्र आणि हरियाणातील भाजपच्या कामगिरीचे कौतुक केले.
देवेंद्र फडणवीस आणि मनोहरलाल खट्टर यांचा मुख्यमंत्रीपदाचा हा पहिलाच अनुभव होता. यापूर्वी हे दोन्ही नेते कधीही साधे मंत्रीही नव्हते. मात्र, तरीही या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी सर्वांना सोबत घेऊन पाच वर्षे आपापल्या राज्यांची अविरत सेवा केल्याचे मोदींनी सांगितले.
पश्चिम महाराष्ट्राच्या आखाड्यात शरद पवारच 'पैलवान'
महाराष्ट्रात २०१४ पूर्वी भाजप नेहमी लहान भावाच्या भूमिकेत असायची. त्यावेळी आमची शिवसेनेसोबत युती होती. त्यांच्याच नेतृत्त्वाखाली सरकारचा सारा कारभार चालायचा. आमच्या काही नेत्यांनाच मंत्रिमंडळात संधी मिळायची. मात्र, महाराष्ट्राची वेगळेपण असे की, गेल्या ५० वर्षात राज्यात एकही मुख्यमंत्री सलग पाच वर्षे टिकू शकला नाही. मात्र, ५० वर्षानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांना सलग पाच वर्षे राज्याची सेवा करण्याची संधी मिळाली, असे मोदींनी सांगितले.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे महाराष्ट्रात राजकीय स्थैर्य असणे खूपच गरजेचे आहे. मात्र, गेल्या ५० वर्षात दोन तृतीयांश बहुमत असलेली सरकारेही राज्यात टिकू शकली नाहीत. गेल्यावेळी भाजप आणि शिवसेनेने महाराष्ट्रात स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. मात्र, जनतेने आम्हाला पुन्हा एकत्र येण्याचा कौल दिला. यावेळीही महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला विजयी केले आहे. राज्यातील जनतेने हा युवा नेतृत्त्व आणि निष्कलंक कारभारावर दाखवलेला विश्वास असल्याचे मोदींनी यावेळी सांगितले.
निकाल महाराष्ट्राचा : महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील हे आहेत विजयी उमेदवार