नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी २० लाख कोटींचे पॅकेजची घोषणा केली आहे. आज संध्याकाळी ४ वाजता अर्थमंत्री निर्मला सीतारामण याबद्दल सविस्तर माहिती देणार आहेत. कोणत्या सेक्टरला किती निधी मिळणार ? याबद्दल अर्थमंत्री माहिती देतील असे सांगितले जातंय. कोरोना प्रादुर्भावामुळे देश आर्थिक संकटात आहे. या पॅकेजचा उपयोग शेतकरी, मजुर, लघु उद्योग आणि कामगारांच्या मदतीसाठी होणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोरोना प्रादुर्भावामुळे देशाच्या आर्थिक वाटचाल थांबवू शकत नाही. कोरोनाशी युद्ध सुरुच राहणार आहे. पंतप्रधानांच्या २० लाख कोटींच्या पॅकेज घोषणेनंतर सर्वसामान्यांच्या मनात काही प्रश्न राहतात. 


भारताची लोकसंख्या १३३ कोटी गृहीत धरली तर प्रत्येकाच्या वाट्याला १५ हजार ०३७.६० रुपये येतील. जर १३० कोटी मानली तर प्रत्येकाच्या वाट्याला १५ हजार ३८४ रुपये येतील. पण प्रत्येक व्यक्तीप्रमाणे ही रक्कम वाटली जाणार नाही हे स्पष्ट आहे.


२० लाख कोटी म्हणजे किती शून्य ?


पंतप्रधान मोदींनी २० लाख कोटींचे पॅकेज जारी केल्यानंतर ही रक्कम नेमकी किती आहे ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. २० च्या पुढे १२ शून्य असा हा आकडा पूर्ण होतो. 



जगभरातील वेगवेगळ्या देशांनी जारी केलेल्या पॅकेजपैकी हे एक मोठे पॅकेज मानले जात आहे. हे पॅकेज देशाच्या जीडीपीच्या १० टक्के असल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. 


भारताने कोरोनाच्या संकटाचे संधीत रुपांतर करायला पाहिजे. तरच २१ व्या शतकावर वर्चस्व ठेवण्याचे आपले स्वप्न पूर्ण होऊ शकते. त्यासाठी भारताला स्वयंपूर्ण होणे अत्यंत आवश्यक आहे भारताने एखादी गोष्ट ठरवली तर काहीच अवघड नाही. आगामी काळात आपल्याला अर्थव्यवस्था, पायाभूत सुविधा, सक्षम व्यवस्था, वैविध्यपूर्ण लोकसंख्याशास्त्र (डेमोग्राफी) आणि मागणी पुरवठ्याच्या चक्राचे सुयोग्य नियोजन या पाच प्रमुख घटकांच्या पायावर देशाची भक्कम इमारत उभारावी लागेल, असे मोदींनी यावेळी सांगितले. त्यासाठी देशातील जनतेने आपला मोर्चा 'ग्लोबल'कडून लोकल उत्पादनांकडे वळवाला. स्थानिक उत्पादनांची केवळ खरेदीच नव्हे तर त्यांचा प्रचारही करा. जेणेकरून स्थानिक उत्पादनांना सुगीचे दिवस येतील, असेही मोदींनी यावेळी म्हटले.


पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात देशाला स्वयंपूर्ण करण्याच्यादृष्टीने भारतीयांनी विचार करायला सुरुवात करावी, या मुद्द्यावर विशेष भर दिला. कोरोनाच्या संकटामुळे जागतिक व्यवस्थेतील कच्चे दुवे उघडे पडले आहेत. या काळात आपल्याला स्थानिक स्रोतच अधिक कामाला आले, याकडे मोदींनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या संकटापूर्वी भारतात पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे नाममात्र उत्पादन केले जायचे. मात्र, सध्या भारतामध्ये प्रत्येक दिवशी जवळपास दोन लाख पीपीई किट आणि एन-९५ मास्कचे उत्पादन होते. भारताने संकटाचे संधीत रुपांतर केल्याचे हे उत्तम उदाहरण असल्याचे मोदींनी सांगितले.