पंतप्रधान मोदींचा ६९वा वाढदिवस; देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव
दरवर्षीप्रमाणे यंदाही आपला वाढदिवस ते गुजरातमध्ये साजरा करत आहेत.
अहमदाबाद: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ६९ वा वाढदिवस साजरा करत आहेत. यानिमित्ताने देशभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ट्विटरवर #HappyBirthdayPM #happybirthdaynarendramodi #HappyBdayPMModi #Prime Minister हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही आपला वाढदिवस ते गुजरातमध्ये साजरा करत आहेत. आज दिवसभर मोदींचा कार्यक्रम ठरलेला आहे. सकाळी सव्वाआठच्या सरदार सरोवर इथे मोदींचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोदींनी केवडियात विविध प्रकल्पाची पाहाणी केली.
नर्मदेच्या तीरावर केवडिया इथे सरदार पटेलांच्या पुतळा परिसरात सुरू करण्यात आलेल्या उद्यानाची पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाहणी केली. बॅटरीवर चालणाऱ्या कारमधून त्यांनी हा प्रवास सुरू केला. या प्रवासात मोदींनी वाटेत या उद्यानात साकारण्यात आलेले प्राणीसंग्रहालय पाहिले. त्यानंतर या उद्यानातल्या निवडुंग उद्यानाला भेट देऊन निवडुंगांच्या विविध प्रजातींची पाहणी केली. तसेच पंतप्रधान मोदींनी फुलपाखरांच्या उद्यानात जाऊन विविध प्रजातीची फुलपाखरे या उद्यानात सोडली.
फुलपाखरांना बास्केटमधून उद्यानात सोडण्याचा हा सोहळा अतिशय नयनरम्य होता. त्यानंतर पंतप्रधान मोदींनी उद्यानात उभारण्यात आलेल्या काही गृहउद्योगाच्या दुकानांना भेटी दिल्या. यानंतर मोदी आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेणार आहेत.