भाजप नेते वसीम बारींच्या हत्येवर पंतप्रधान आणि भाजप अध्यक्षांनी व्यक्त केलं दुःख
जम्मू-काश्मीरमध्ये बुधवारी रात्री दहशतवाद्यांनी भाजप नेत्याची हत्या केली.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या बांदीपोरा येथे भाजप नेते आणि जिल्हाध्यक्ष वसीम बारी यांची दहशतवाद्यांनी हत्या केली. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात वसीमचे भाऊ आणि वडील यांनाही गोळ्या घालण्यात आल्या, नंतर दोघांचाही मृत्यू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही वसीम बारी यांच्या हत्येबद्दल शोक व्यक्त केला आहे. भाजप नेते जितेंद्र सिंह म्हणाले की, 'पंतप्रधान मोदींना फोनवरून वसीम बारी यांच्या हत्येची माहिती मिळाली आहे. त्यांनी वसीमच्या कुटुंबीयांबद्दलही संवेदना व्यक्त केली.'
नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनीही वसीम बारीवरील दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत दुख व्यक्त केलं आहे. ओमर अब्दुल्ला यांनी ट्विट केले की, 'आज संध्याकाळी बांदीपोरा येथे भाजप अधिकारी आणि त्यांच्या वडिलांवर प्राणघातक दहशतवादी हल्ल्याबद्दल ऐकून फार वाईट वाटले. या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करतो. या कठीण काळात मी त्याच्या कुटुंबासमवेत शोक व्यक्त करतो.'
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी नड्डा यांनी वसीमच्या निधनावर ट्विट केले की, 'आम्ही बांदीपोरामध्ये शेख वसीम बारी, त्यांचे वडील व भाऊ गमावले. पक्षासाठी हे मोठे नुकसान आहे. मी त्यांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त करतो. संपूर्ण पक्ष त्याच्या कुटुंबासोबत उभी आहे. मी खात्री देतो की त्यांचा त्याग व्यर्थ जाणार नाही.'
या हल्ल्याबद्दल चित्रपट निर्माते अशोक पंडित यांनी लिहिले की, 'वसीम बारीच्या कुटुंबात भाकरी कमवणाऱ्या सर्व लोकांची हत्या केली गेली. कुटुंबातील महिलांच्या परिस्थितीची कल्पना करा. त्याचा एकच दोष होता की त्याने भारतावर विश्वास ठेवायचा.'
भाजप नेते शेख वसीम बारी आणि त्याचा भाऊ उमर सुलतान आणि वडील बशीर अहमद शेख यांची हत्या करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी रात्री नऊच्या सुमारास जिल्हा भाजप अध्यक्ष वसीम बारी यांच्यावर त्यांच्या दुकानाबाहेर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा भाऊ उमर सुलतान आणि वडील बशीर अहमद जखमी झाले. त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल करण्यात आले पण त्यांचा मृत्यू झाला.