PM Narendra Modi Speech in Loksabha: लोकसभेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांच्या अभिभाषणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत आभार प्रस्ताव (Motion of thanks) मांडला. जेव्हा मी इथून पाहिलं, तेव्हा या नवीन सभागृहात राष्ट्रपतींचं स्वागत करतानाचं हे खरंच सुखद दृश्य होतं, असं नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) म्हणाले आहेत. भाषणावेळी नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू देखील ठोकले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नवीन सभागृहातील ही नवी परंपरा भारताच्या स्वातंत्र्याच्या त्या पवित्र क्षणाचे प्रतिबिंब बनतं तेव्हा लोकशाहीची प्रतिष्ठा अनेक पटींनी वाढते. मी विरोधकांच्या ठरावाचं कौतुक करतो. तुम्ही बराच काळ बाहेर राहण्याचा संकल्प केला होता. विरोधकांना जनता नक्कीच प्रत्युत्तर देईल. पुढच्या निवडणुकीत प्रेक्षक गॅलरीत बरेच लोक दिसतील, असा टोला नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लगावला आहे.


काँग्रेसला स्वप्न पाहण्याची हिंमत नाही. भारतीय लोक आळशी आहेत, असा नेहरूंचा विचार होता, असं म्हणत मोदींनी काँग्रेसला चिमटे घेतले आहेत. प्रत्येक योजनेला काँग्रेसचा विरोध होतो. काँग्रेसने पुढची 30 वर्षे सत्तेची वाट पाहू नये. आम्ही जे केलं ते करायला काँग्रेसच्या 5 पिढ्या गेल्या असत्या. त्यांना आमच्यासारखं काम करायला 100 वर्ष गेली असती. तिसऱ्या टर्ममध्ये भारत महासत्ता होणार, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.



 


विरोधकांच्या प्रत्येक शब्दाने माझा आणि देशाचा आत्मविश्वास वाढला आहे. तुम्ही कितीही मेहनत करत असलात तरी देवासारखी माणसं तुम्हाला नक्कीच आशीर्वाद देतील. राष्ट्रपतींनी चार मजबूत स्तंभांचा उल्लेख केला आहे. महिला शक्ती, युवा शक्ती, गरीब आणि शेतकरी, मच्छीमार आणि पशुपालक. त्यांच्या सक्षमीकरणाने देश विकसित भारत होईल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला आहे.


काँग्रेसचे अनेक नेते आता राज्यसभेवर जाण्याचा विचार करत आहेत आणि या सर्वांना लोकसभा निवडणूक लढवायची नाही, असं म्हणत पंतप्रधान मोदींनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 370 जागा मिळतील तर एनडीएला 400 च्या वर जागा मिळतील, असं वक्तव्य नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. त्यामुळे आता मोदींनी थेट लोकसभा निवडणुकीसाठी शड्डू ठोकले, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.