कलम ३७० रद्द झाल्यावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला.
नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्यासाठी गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत प्रस्ताव मांडला. यानंतर राज्यसभेत यावर चर्चा झाली, या चर्चेनंतर जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याला राज्यसभेने मंजुरी दिली. आवाजी मतदानाने १२५ विरुद्ध ६१ अशा मताने कलम ३७० रद्द करण्यात आलं. कलम ३७० सोबतच कलम ३५ एदेखील रद्द करण्यात आलं आहे.
राज्यसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर आता उद्या लोकसभेत हे विधेयक मांडलं जाणार आहे. लोकसभेमध्ये भाजपचं स्पष्ट बहुमत बघता हे विधेयक तिकडेही मंजूर होईल हे जवळपास निश्चित आहे.
जम्मू-काश्मीरबाबतच्या या ऐतिहासिक निर्णयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. 'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेमध्ये विस्तृत आणि सखोल भाषण केलं. या भाषणामध्ये अमित शाह यांनी इतिहासातल्या चुका आणि आमची जम्मू-काश्मीरच्या बंधू-भगिनींसाठीची भूमिका योग्य आणि सुसंगतपणाने मांडली', असं नरेंद्र मोदी त्यांच्या ट्विटमध्ये म्हणाले.