अमेरिकेकडून भारतीय नागरिक निखील गुप्तावर लावण्यात आलेल्या गंभीर आरोपांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. जर कोणत्याही देशाने आम्हाला काहीही माहिती दिली तर आम्ही नक्कीच त्याचा गांभीर्याने विचार करु असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. आमच्या कोणत्याही नागरिकाने काही योग्य किंवा चुकीचं वर्तन केलं असेल तर आम्ही त्याचं निरीक्षण करण्यास तयार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. कायद्याच्या राज्यासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचं नरेंद्र मोदींनी स्पष्ट केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमेरिकेने नुकताच भारतीय नागरिक निखिल गुप्तावर शिख फॉर जस्टिस या फुटीरतावादी गटाचे सरचिटणीस गुरपतवंत सिंग पन्नू याच्या हत्येचा आरोप केला आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फायनान्शिअल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे की, परदेशात लपलेले काही दहशतवादी गट अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली घाबरवण्याचा आणि हिंसा भडकावण्याचा प्रयत्न करत आहेत. 


नुकतंच अमेरिकेच्या न्याय विभागाने 52 वर्षीय भारतीय नागरिक जो भारत सरकारचा कर्मचारी देखील आहे, त्याने उत्तर भारतात वेगळ्या शीख राष्ट्राची मागणी करणाऱ्या न्यूयॉर्क शहरातील रहिवाशाच्या (पन्नू) हत्येचा कट रचला होता असं म्हटलं आहे.


एका भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याने मे 2023 च्या आसपास न्यूयॉर्कमध्ये पन्नू याच्या हत्येची सुपारी निखिल गुप्ता याला दिली. आरोपपत्रात या कथित भारतीय गुप्तचर अधिकाऱ्याच्या नावाचा उल्लेख नाही. मात्र, त्याचा उल्लेख सीसी 1 (चीफ कॉन्स्पिरेटर) अर्थात मुख्य कारस्थानी/सूत्रधार असा करण्यात आला आहे असं आरोपपत्रात लिहिण्यात आलं आहे. 


पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, सुरक्षा आणि दहशतवादविरोधी सहकार्य हे दोन्ही देशांमधील भागीदारीचे प्रमुख घटक आहेत. काही घटनांचा संबंध दोन्ही देशांतील राजनैतिक संबंधांशी जोडणं मला योग्य वाटत नाही. आपण बहुपक्षीयतेच्या युगात जगत आहोत हे सत्य स्वीकारले पाहिजे. जग हे एकमेकांशी जोडलेलं आहे, तसंच एकमेकांवर अवलंबून आहे. हीच वास्तविकता आपल्याला एकमेकांना सहकार्य करण्यास भाग पाडते, कारण सर्व बाबींवर पूर्ण सहमती असू शकत नाही.


निखिल गुप्ता याला 30जूनला चेक प्रजासत्ताकमध्ये अटक करण्यात आली. अमेरिकेत आरोपपत्र दाखल होण्याआधी त्याला अमेरिकेच्या हवाली करण्यात आलं होतं.