Live update : पश्चिम बंगालशी माझे चहाचे नाते आहे- पंतप्रधान
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. प.बंगालमध्ये या आठवड्यातील ही तिसरी सभा आहे.
कोलकाता : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या पश्चिम बंगाल दौऱ्यावर आहेत. प.बंगालमध्ये या आठवड्यातील ही तिसरी सभा आहे. यावेळी पंतप्रधानांनी उच्च न्यायालयाच्या नव्या खंडपीठाचे उद्घाटन देखील केले. उच्च न्यायालया संबंधी प्रकरणात तुम्हाला कोलकात्याला जावे लागणार नाही तर जलपायगुडी येथेच निर्णय लागतील असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. यामुळे तुमचा येण्याजाण्याचा वेळ आणि खर्च वाचणार असल्याचे त्यांनी सांगितले. 20 वर्षांपूर्वी खंडपीठाची मागणी करण्यात आली होती. 12-13 वर्षांपूर्वी याला मंजूरी देखील देण्यात आली होती. पण आता हे खंडपीठ प्रत्यक्षात आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. पश्चिम बंगालशी माझे चहाचे नाते असल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही चहा बनवणारे आहात मी चहा विकणारा असल्याचे त्यांनी सांगितले. चहा बनवणाऱ्यांबद्दल दीदींना इतका राग का आहे ? असा टोला त्यांनी ममता बॅनर्जी यांना लगावला आहे.
भाजपा सरकारच्या चांगल्या कामांना कॉंग्रेस रोखू लागली आहे. पण देशाचा गरीब आमच्या सोबत आहे. कर्जमाफीच्या नावाखाली कॉंग्रेस शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले. आज त्यांनी राष्ट्रीय महामार्ग-31 डी के फलाकाता-सलसलाबाडी क्षेत्राला चार लेन करण्याच्या प्रकल्पाचे भूमीपुजन केले. हा राष्ट्रीय महामार्ग 41.7 किलोमीटर लांब असून तो पश्चिम बंगालच्या जलपाईगुडी जिल्ह्यात येतो. यासाठी एकूण 1938 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे.