विरोधकांकडे विकासाची दृष्टी नाही - नरेंद्र मोदी
विकासाची कोणतीही दृष्टी नसलेल्या विरोधकांचा केवळ मोदी हटाव एवढाच एकमेव उद्देश आहे, अशी खिल्ली पंतप्रधानांनी उडवली.
सिल्वासा (गुजरात) : विकासाची कोणतीही दृष्टी नसलेल्या विरोधकांचा केवळ मोदी हटाव एवढाच एकमेव उद्देश आहे, अशी खिल्ली पंतप्रधानांनी उडवली. सिल्वासा इथे एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. आमचे सरकार विकासाच्या मुद्द्यावर चालत आहे. सबका साथ सबका विकास या मंत्रावर सरकार चालत आहे. लहान मुलांचे शिक्षण, तरुणांना रोजगार, ज्येष्ठांसाठी औषध उपचार आणि शेतकऱ्यांसाठी सिंचन तसेच सर्वसामान्यांचा विकास हाच आमचा राजमार्ग आहे, असे प्रतिपादन मोदी यांनी केले.
कोलकाता येथील विरोधकांच्या रॅलीवर मोदींना टीका केली. लोकशाहीची गळचेपी करणारे लोकच आज लोकशाही वाचवा अशा घोषणा देत आहेत. हे पाहून देशातल्या जनतेच्या तोंडी वाह छान, असेच उद्गार उमटले असावेत असा टोला मोदी यांनी लगावला आहे. सिल्वासा येथील कार्यक्रमात मोदी यांनी विरोधकांच्या महारॅलीला आणि त्यांच्याकडून होणाऱ्या टीकेला उत्तर दिले आहे.
पश्चिम बंगालमध्ये उभी राहिलेली विरोधकांची महारॅली ही मोदी विरोधी नाही तर जनतेच्या विरोधातली आहे, असे मोदी यांनी प्रतिउत्तर दिले आहे. आम्ही विकासावर भर दिला आहे. आम्हाला पुढे जायचे आहे. माझ्यावर टीका करण्यापासून सुरुवात होते आणि शिव्या देऊन यांचा दिवस संपतो, असे मोदी म्हणालेत. जरी असे असले तरी मला त्यांच्याशी काही घेणे देणे नाही. सव्वाशे कोटी जनतेवर माझा विश्वास आहे. त्यांचा विकास कसा होईल, यासाठी मी प्रयत्न करीत आहे, असे मोदी यांनी म्हटले आहे.
सिल्वासा या ठिकाणी एका मेडिकल कॉलेज कामाच्या भूमिपूजनासाठी पंतप्रधान मोदी आले होते. याच कार्यक्रमाच्यावेळी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. केंद्र सरकारचा स्वच्छ आणि पारदर्शी कारभार या विरोधकांना पाहायचा नाही. त्यामुळेच अशा प्रकारे महारॅलीचे आयोजन करुन टीका केली जात आहे.