नवी दिल्ली : Coronavirus च्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांतील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या बैठकीनंतर देशभरात पुन्हा एकदा लॉकडाऊन नेमका किती कालावधीपर्यंत कायम राहणार की ठरलेल्या तारखेला शिथिल केला जाणार हा प्रश्न उभा राहिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३ मे रोजी मोदी सरकारकडून लागू करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनचा दुसरा टप्पा संपणार आहे. ज्यानंतर कोरोनाचा एकंदर प्रादुर्भाव, देशभरातील स्थिती पाहता कोरोनाच्या एक्झिट प्लानची आखणी केली जाणार असल्याचं कळत आहे. कोरोनाचा संसर्ग रोखणं आणि याचवेळी देशाचा मंदावलेला आर्थिक वेग कमी करणं हे या एक्झिट प्लानचे महत्त्वाचे निकष असणार असल्याचं म्हटलं जात आहे. 


काही वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार ३ मे नंतर ल़ॉकडाऊन हा पूर्णपणे शिथिल केला जाणार नाही. तर, काही नियम आणि सोशल डिस्टंसिंगच्या अटींची पूर्तता होत असल्याचं लक्षात घेतच पुढील निर्णय घेण्यात येतील. लॉकडाऊनचा पुढचा टप्पा हा केंद्राच्या भूमिकेपेक्षा राज्य सरकारच्या भूमिकांवर जास्त आधारलेला असू शकतो. 


 


मुख्यमंत्र्यांकडून पुढील आखणीची अपेक्षा


पुढील काही दिवसांमध्ये देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेत पुढील दिवसांसाठीची आखणी पंतप्रधानांकडे देणं अपेक्षित आहे. ज्यानंतर पंतप्रधान स्वत: या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा विविध क्षेत्रांमध्ये विभागणी झालेल्या विभागांच्या अनुशंगाने ही आखणी केली जाणार आहे. लॉकडाऊनच्या या टप्प्यात नागरिकांच्या सुरक्षिततेसोबत आणि कोरोनाला आळा घालण्याच्या निकषांसोबतच अर्थव्यवस्थेला चालणा देण्यालाही महत्त्वं देण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काळात साऱ्या देशाच्याच दृष्टीने एक्झिट प्लान महत्त्वाचा असणार आहे हेच स्पष्ट होत आहे.