काश्मिरी नागरिकांचा विश्वास जिंकण्यासाठी मोदी सरकार उचलणार `हे` पाऊल
पुढील दोन ते तीन महिन्यात जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय सेवांमध्ये ५० हजार नोकऱ्या देणार
नवी दिल्ली: जम्मू काश्मीरच्या नागरिकांच्या मनात विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी आता केंद्र सरकारने महत्त्वाची पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक मंत्र्याने आपल्या मतदारसंघात असलेल्या जम्मू काश्मीरच्या नागरिकांचा शोध घेऊन त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आदेश पंतप्रधानांनी मंत्रिमंडळ बैठकीत दिले आहेत. तसेच जनतेला पूर्ण करता येतील अशीच आश्वासने द्या, अशी ताकीदही मोदींनी मंत्र्यांना दिल्याचे समजते.
दुसरीकडे काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सरकार जम्मू काश्मीरमध्ये कायदा आणि सुव्यवस्था सुस्थितीत ठेवण्यात यशस्वी झाल्याचे सांगितले.
जम्मू काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर गेल्या २४ दिवसांत एकाही व्यक्तीला जीव गमवावा लागला नाही. हे आमच्यासाठी यश असल्याचे जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले. तसेच पुढील दोन ते तीन महिन्यात जम्मू काश्मीरच्या प्रशासकीय सेवांमध्ये ५० हजार नोकऱ्या देणार असल्याची माहितीही मलिक यांनी दिली.
यावेळी त्यांनी राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. जम्मू-काश्मीरप्रश्नी राहुल गांधी यांनी बालिश वक्तव्य केले आहे. या मुद्द्यावर काँग्रेसने अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांवेळी त्यांनी अनुच्छेद ३७० चे समर्थन केले तर लोक त्यांना जोड्याने मारतील, असे सत्यपाल मलिक यांनी म्हटले.
पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाला लिहलेल्या पत्रात राहुल गांधी यांच्या विधानाचा हवाला देत काश्मीरची परिस्थिती खराब असल्याचा दावा केला होता. त्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राहुल गांधी यांनी घुमजाव करत काश्मीर हा भारताचा अंतर्गत प्रश्न असल्याचे स्पष्ट केले होते.