मुंबई: आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना अखेर सोमवारी यश आले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. त्यानंतर काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून यावर भाष्य केले. त्यांनी म्हटले की, शिवसेना आणि आमचे नाते राजकारणापलीकडचे आहे. सशक्त आणि विकसित भारत हे आमचे समान उद्दिष्ट आहे. शिवसेनेच्या युतीच्या निर्णयामुळे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची (रालोआ) ताकद वाढणार आहे. महाराष्ट्रातील जनता नक्कीच युतीच्या पारड्यात दान टाकेल, याचा मला विश्वास आहे, असे मोदी यांनी सांगितले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गेल्या साडेचार वर्षांपासून केंद्र आणि राज्यात शिवसेना आणि भाजप यांच्यात कमालीचा तणाव आहे. दोन्ही पक्ष एकत्र सत्तेत असले तरी स्थानिक पातळीवर एकमेकांवर कुरघोडी करण्याची एकही संधी सोडत नाहीत. या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शिवसेनेकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता युतीची घोषणा होताच वातावरण पूर्णपणे पालटले आहे. इतके दिवस शिवसेनेची साधी दखलही न घेणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून शिवसेनेसोबतच्या जुन्या नात्याचा उल्लेख केला आहे. 




शिवसेना-भाजप लोकसभा आणि विधानसभा अशा दोन्ही निवडणुका एकत्रितरित्या लढतील. लोकसभा निवडणुकीत शिवसेना २३ आणि भाजप २५ जागांवर लढेल. तर विधानसभा निवडणुकीत घटकपक्षांना जागा दिल्यानंतर शिवसेना-भाजप समसमान जागांवर लढतील. यावेळी मुख्यमंत्र्यांनी युतीमागची भूमिकाही स्पष्ट केली.  आमच्यात मतभेद असतील, पण सैद्धांतिकदृष्ट्या आमचा विचार एकच आहे. तब्बल २५ वर्षे शिवसेना-भाजपची युती होती. मात्र, गेल्या निवडणुकीत आम्हाला काही कारणांमुळे एकत्र येता आले नाही. मात्र, त्यानंतर गेली साडेचार वर्षे केंद्र व राज्यात आम्ही एकत्रितरित्या सरकार चालवत आहोत, असे फडणवीस यांनी सांगितले. गेल्या काही काळापासून काही लोक एकत्र येऊन देशात संक्रमणाची अवस्था निर्माण करत आहेत. त्यांनी राष्ट्रीय विचारांना आव्हान दिले आहे. अशावेळी शिवसेना व भाजपसारख्या राष्ट्रीय विचार असलेल्या पक्षांनी एकत्रितरित्या निवडणूक लढवावी, अशी जनभावना होती. याच जनभावनेचा आदर करून शिवसेना-भाजप लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक एकत्रितरित्या लढवतील, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.