नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर 10 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितलं की, भारतात कोरोना चाचण्यांची संख्या वाढत असून ती रोजची संख्या 7 लाखांपर्यंत पोहचली आहे. त्यामुळे कोरोनाची ओळख होण्यास आणि त्यावर आळा घालण्यास मदत होत आहे. आपल्या देशात मृत्यूचं प्रमाण आधीपासून कमी होतं आणि ते सातत्याने कमी होत आहे, ही समाधानाची बाब आहे. रिकव्हरी रेटही सतत वाढत आहे. कोरोनाविरुद्ध लढण्यास आपले प्रयत्न सफल होत आहेत, असं मोदी म्हणाले. 



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकांमध्ये विश्वास वाढला असून कोरोनाची भिती कमी झाली आहे. आपण मृत्यूदर 1 टक्क्याहूनही कमी करण्याचं जे उदिष्ट्य ठेवलं आहे ते साध्य करण्याचा प्रयत्न करा, असं मोदींनी सांगितलं. पंतप्रधानांनी आरोग्य सेतू ऍपचंही कौतुक केलं. त्यांनी, आरोग्य सेतू ऍपमुळे संसर्ग झालेल्या रुग्णांना ट्रॅक करण्यासाठी मोठी मदत होत असल्याचं म्हटलंय. 72 तासांमध्ये आजाराची माहिती मिळाल्यास धोका कमी होत असल्याचंही, मोदी म्हणाले.



पंतप्रधानांनी सांगितलं की, आज 80 टक्के ऍक्टिव्ह रुग्ण दहा राज्यांमध्ये आहेत, त्यामुळे कोरोनाविरोधात लढण्यासाठी या सर्व राज्यांची भूमिका महत्त्वाची आहे. ज्या राज्यात टेस्टिंग रेट कमी आणि पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अधिक आहे, तेथे टेस्टिंग वाढवण्याची गरज आहे. या चर्चेदरम्यान बिहार, गुजरात, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि तेलंगणामध्ये चाचण्यांची संख्या वाढवण्यावर विशेष भर देण्यात येण्याची बाब समोर आली आहे.


'आतापर्यंतचा असा अनुभव आहे की, कंटेन्मेंट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि सर्विलान्स ही कोरोनाविरुद्ध सर्वात प्रभावी शस्त्रं आहेत. आता लोकांमध्येही याबाबत जनजागृती झाली असून लोक सहकार्य करत असल्याचं', मोदी म्हणाले.


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, पंजाब, बिहार, गुजरात, तेलंगाणा आणि उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोना व्हायरसबाबत चर्चा केली. पंतप्रधान मोदींनी गेल्या 5 पाच महिन्यात राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी केलेली ही सातवी बैठक होती.