PM Narendra Modi in Punjab : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंजाब दौऱ्यादरम्यान सुरक्षेत गंभीर त्रुटी आढळून आली. केंद्रीय गृहमंत्रालयाने ही माहिती दिली आहे. पंजाब दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी भटिंडा इथं पोहचले, तिथून पंतप्रधान हुसैनीवाला इथल्या राष्ट्रीय शहीद स्मारकाकडे हेलिकॉप्टरने जाणार होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पण पाऊस आणि खराब हवामानामुळे हा प्लान रद्द करण्यात आला. यानंतर रस्तेमार्गेच राष्ट्रीय शहीद स्मारकाला भेट देण्याचं ठरवण्यात आलं. यानुसार गृह मंत्रालयाने डीजीपी पंजाब पोलिसांकडून आवश्यक सुरक्षा व्यवस्थेची माहिती घेतली. यानंतर पंतप्रधानांचा ताफा रस्ते मार्गे निघाला.  


हुसैनीवाला (Hussainiwala) इथल्या राष्ट्रीय शहीद स्मारकापासून (National Martyrs Memorial) सुमारे 30 किमी अंतरावर पंतप्रधानांचा ताफा उड्डाणपुलावर पोहोचला.  यावेळी काही आंदोलकांनी रास्ता रोको केल्याचं दिसून आलं. त्यात पंतप्रधान मोदींना 15-20 मिनिटे फ्लायओव्हरवर अडकून राहावं लागल्याचं सांगण्यात आलं. पंतप्रधानांच्या सुरक्षेतील ही मोठी चूक होती (Security Breach PM Modi).


सुरक्षेची जबाबदारी पंजाब सरकारची 
गृह मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या दौऱ्याचं वेळापत्रक आणि प्रवासाची योजना पंजाब सरकारला (Punjab Government) आधीच कळवण्यात आली होती. त्यानुसार सुरक्षा आणि उपाययोजना सज्ज करण्याची जबाबदारी पंजाब सरकारची होती. पण असं झालं नाही. पंजाब सरकारने त्यादृष्टीने अशी कोणतीही तयारी केली नव्हती असं केंद्रीय गृहमंत्रालयाने म्हटलं आहे.


सुरक्षेतील त्रुटींबाबत राज्य सरकारकडून अहवाल मागवला
सुरक्षेतील त्रुटींमुळे पंतप्रधान मोदींचा ताफा भटिंडा विमानतळावर परतण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरक्षेतील या गंभीर त्रुटीची दखल घेत गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून सविस्तर अहवाल मागवला आहे. या गैरप्रकाराची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई करावी, असंही राज्य सरकारला सांगण्यात आलं आहे.