आरक्षणासंदर्भातल्या निर्णयात राज्यसभेचे मोठे योगदान - मोदी
आरक्षणासंदर्भातल्या निर्णयात राज्यसभेचे मोठे योगदान आहे, असे मोदी यांनी गौरवोद्गार काढले.
नवी दिल्ली : आरक्षणासंदर्भातल्या निर्णयात राज्यसभेचे मोठे योगदान आहे, असे सांगत २५० व्या अधिवेशनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौरवोद्गार काढले तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दलाकडून सर्वपक्षीयांना शिकण्यासारखे आहे, असे मोदींनी कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यसभेत केलेल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेस आणि बीजू जनता दलाचे खास कौतुक केले. या दोन्ही पक्षाचे खासदार कधीही गोंधळ घालण्यासाठी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत आले नाहीत. या दोन्ही पक्षांकडून इतरांनी शिकण्याची गरज आहे, असे मोदी म्हणाले. संसदेच्या २५० व्या अधिवेशनात सहभागी होणे ही भाग्याची गोष्ट आहे, असं सांगतानाच देशाची धोरणे ठरवण्यात राज्यसभेचं मोठे योगदान आहे, असे पंतप्रधान म्हणाले.
आजपर्यंत संसदेची परंपरा आणि प्रवास प्रेरणादायी होता. आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु होत आहे. या सत्रात काही वाद-विवाद होतील, मात्र, चांगल्या चर्चा व्हाव्यात, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली आहे.
यंदा संविधानाला ७० वर्ष पूर्ण होत आहेत. २६ नोव्हेंबरला संविधान दिवस आहे. आजपर्यंतचा संसदेचा प्रवास प्रेरणादायी होता. २०१९ मधील हे शेवटचे सत्र आहे आणि शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली आहे. त्यामुळे या सत्रात काही वाद-विवाद होण्याची शक्यता आहे. तरीही चांगल्या प्रकारे चर्चा घडवून याव्यात, अशी आशा बाळगतो, असेही मोदी म्हणाले.