बंगळुरु : एचडी कुमारस्वामी यांनी आज कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कर्नाटकमध्ये आज काँग्रेस-जेडीएसचं सरकार स्थापन झालं. कुमारस्वामी यांनी राज्याच्या 26व्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कुमारस्वामींच्या शपथ विधी सोहळ्यासाठी अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. भाजपने मात्र या शपथविधी सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांना फोन करुन शुभेच्छा दिल्या.



कर्नाटकमध्ये सर्वात मोठा पक्ष भाजप असूनही त्यांना बहुमत सिद्ध करता न आल्याने येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्याला सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, अखिलेश यादव, मायावती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, आरजेडी नेता तेजस्वी यादव, सीताराम येच्यूरी यांच्यासह अनेक भाजप विरोधी नेते एकत्र आले होते.