पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री ८ वाजता देशवासीयांशी साधणार संवाद
समस्त राष्ट्राचे लक्ष मोदींच्या आजच्या भाषणाकडे लागले आहे.
मुंबई : आज रात्री ८ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधणार आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे तर दुसरीकडे १७ मे रोजी लॉकडाउनचा तिसरा टप्पा संपणार आहे. अशा परिस्थितीत मोदी आज काय बोलणार आहेत याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कोरोना व्हायरसचा फैलाव जेव्हापासून भारतात सुरू झाला तेव्हापासून ते सतत देशवासीयांशी संवाद साधत त्यांचं मनोबळ वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.
आज देशवासीयांशी संवाद साधणार असल्याची घोषणा त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. त्यामुळे समस्त राष्ट्राचे लक्ष त्यांच्या आजच्या भाषणाकडे लागले आहे. कोरोना विरुद्ध लढाईच्या काळात त्यांनी चार वेळा देशाला संबोधित केलं आहे. आज जनतेशी संवाद साधण्याची त्यांची पाचवी वेळ आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केल्यानंतर देशातील लॉकडाऊनचा कालावधी आणखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. ज्यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, तेलंगाणा, पश्चिम बंगाल, बिहार यांसारख्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्याची मागणी मोदींकडे केली.