मुंबई : सर्वत्र ख्रिसमसच्या उत्साही वातावरणाला उधाण आलं असून प्रत्येकजण या आनंद पर्वात सहभागी होत आहे. ख्रिसमस म्हटलं की सांताक्लॉज आणि सांताक्लॉज म्हटलं की त्याच्याकडे असणारं विविध भेटवस्तूंचं पोतं. मग त्या पोत्यात नेमकं दडलंय तरी काय, हे पहाण्यासाठीसुद्धा अनेकांचीच धडपड सुरु असते. यंदाच्या वर्षी याच उत्साही वातावरणात पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी झाले असून, त्यांनी आसामच्या रहिवाशांना एक खास भेट देणार आहेत.   


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिसमसच्या मुहूर्तावर पंतप्रधान नरेंद्र मोदी पूर्वोत्तर राज्य आसामला मोठी भेट देणार आहेत. आसामच्या दिब्रुगढमध्ये ब्रम्हपुत्रा नदीवर देशातला सर्वाधिक लांबीचा आणि आशियातल्या दुसऱ्या क्रमांकाचा दुमजली मोठा पूल बांधण्यात आला आहे. 


मंगळवारी, ख्रिसमसच्या आनंदपर्वाचं औचित्य साधत पंतप्रधानांच्या हस्ते या पुलाचं लोकार्पण करण्यात येणार आहे. तब्बल २१ वर्षांनंतर ब्रह्मपुत्रा नदीवरील रेल-रोड या दुमजली पुलाचं आसामवासियांचं स्वप्न साकार झालं आहे. आसाम आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील दक्षिण-उत्तर भागाला जोडणारा हा पूल देशांच्या संरक्षण विभागाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे. 


भारत-चीनच्या सीमावर्ती भागात दिब्रुगढ आणि धेमाजीदरम्यान असलेला हा पूल अरुणाचल प्रदेशमधल्या सैनिकी तळावर अत्याधुनिक शस्त्रसाठे कमी वेळात उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं दुमजली उड्डाण पूल उपयुक्त ठरणारेय. या पुलाला केलेली आकर्षण रोषणाई सर्वांचं लक्ष वेधून घेतेय.