कोरोनाचा पुन्हा उद्रेक, पंतप्रधान मोदींची VC द्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा
देशात काही राज्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक होताना दिसत आहे. केरळ, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांची रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज VC द्वारे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्रासह (Maharashtra) काही राज्यात कोरोनाचा (coronavirus) पुन्हा उद्रेक होताना दिसत आहे. केरळ, पंजाब, कर्नाटक आणि गुजरात या राज्यांची रुग्णसंख्याही वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज VC द्वारे देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. या चर्चेत कोरोनावरील उपयायोजना, लसीकरण आणि त्यात येणा-या अडचणींसंदर्भात चर्चा होणार आहे. भाजप खासदारांना मतदारसंघातील लसीकरण आणि त्याच्या व्यवस्थेसंदर्भात माहिती देण्याबाबत सांगण्यात आलंय. भाजप अध्यक्षांना लसीकरणासंदर्भात अहवाल देण्याबाबत सांगण्यात आले आहे.
देशातला रुग्णांचा आकडा वाढला. मंगळवारी एकूण 28हजार 903 रुग्ण वाढलेयत. तर 17 हजार 741 जण कोरोनामुक्त झालेयत. तर 188 जणांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. अॅक्टिव्ह रुग्णांचा आकडा गेलाय 2 लाख 34 हजार 406 वर गेला आहे. तर आजवर 3 कोटी 50लाख 64 हजार 536 जणांचं लसीकरण दोन महिन्यात झाले आहे.
देशभरातील कोविड -19च्या प्रकरणांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. याबाबत मोदी यांनी चिंता व्यक्त केली आहे. सर्व मुख्यमंत्र्यांसमवेत सध्याची परिस्थिती आणि त्यासंबंधी आवश्यक उपाययोजनांविषयी चर्चा करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्समाध्यमातून ते संवाद साधणार आहे.या बैठकीत पंतप्रधान देशभरात सुरू असलेल्या कोरोनालसीकरण मोहिमेवरही विचार-विनिमय करतील. वृत्तानुसार, 17 मार्च रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास व्हीसीद्वारे ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने रात्रीच्या वेळी कर्फ्यू लागू करण्यात आला असून अनेक निर्बंध जाहीर करण्यात आले आहेत.
कोरोना साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेशांच्या प्रमुख मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ आरोग्य अधिकाऱ्यांशी नियमित संवाद साधण्यात येतआहे. सामूहिक लसीकरण कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी जानेवारीत मोदी यांनी संवाद साधला होता. पहिल्या टप्प्यात सुमारे तीन कोटी आरोग्यसेवा आणि कामगारांच्या लसीकरणाचा खर्च केंद्र सरकार घेणार असल्याचे पंतप्रधानांनी यापूर्वी जाहीर केले आहे.
कोरोनाची दुसरी लाट आली आहे का?
महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. केंद्र सरकारनं राज्य सरकारला पत्र लिहून त्याबाबत सावधानतेचा इशारा दिलाय. कोरोना रोखण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न कमी पडत असल्याचा ठपकाही केंद्रानं या पत्रात राज्य सरकारवर ठेवलाय. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना पत्र पाठवून अनेक सूचना केल्या आहेत. तसंच कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, विलगीकरण आणि जास्तीत जास्त चाचण्या करण्यात राज्य सरकार कमी पडत असल्याची खंत आरोग्य सचिवांनी पत्रात व्यक्त केलीय. नागरिक नियम पाळत नसल्याचंही या पत्रात नमूद केलंय. मात्र केंद्राच्या सूचनांचं पालन काटेकोरपणे करत असल्याचा दावा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण वाढत आहे. औरंगाबादेत कोरोनाचा कहर वाढतच चालल्यामुळे प्रशासनाने व्यापा-यांना सुद्धा टेस्ट सक्तीच्या केल्या आहेत. दरम्यान मंगळवारी रात्री उशिरापर्यंत तब्बल 61 व्यापारी पॉझिटिव्ह आले आहेत. तर दिवसभरात शहरात 1 हजार 171कोरोनाबाधित सापडले असून 7 जणांचा मृत्यू झाला आहे. प्रादुर्भाव वाढत चालल्यानं महापालिकेची कोविड सेन्टर सुद्धा फुल झाली आहेत.