नवी दिल्ली: संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेले दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकाल मंगळवारी जाहीर झाले. यामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने (आप) भाजप आणि काँग्रेसला एकहाती धूळ चारली. त्यामुळे अरविंद केजरीवाल सलग तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी ट्विट करून अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन केले. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयासाठी मी 'आप' आणि अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन करतो. दिल्लीच्या जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, असे मोदींनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. 


#DelhiResults2020: भाजप नेत्यांनी चिथावणीखोर वक्तव्ये केलेल्या मतदारसंघांचा निकाल काय?


यंदाची दिल्ली विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने संपूर्ण ताकद पणाला लावली होती. त्यासाठी केंद्रीय मंत्री, खासदार आणि स्टार प्रचारकांचा फौजफाटा मैदानात उतरवण्यात आला होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने राष्ट्रवादाचा मुद्दा घेऊन अत्यंत आक्रमक प्रचार केला होता. याउलट 'आप'ने शिक्षण, आरोग्य आणि वीज अशा मुलभूत मुद्द्यांवर लक्ष केंद्रित केले होते. त्यामुळे भाजपचा आक्रमक प्रचार केजरीवालांचा गड भेदणार का, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली होती. 


#DelhiResults2020: 'हे' आहेत दिल्लीतील विजयी उमेदवार



मात्र, आज निकाल समोर आल्यानंतर ही अपेक्षा पूर्णपणे फोल ठरली. २०१५ च्या निवडणुकीत भाजपला अवघ्या तीन जागा मिळाल्या होत्या. मात्र, एक्झिट पोल्सनी यंदा भाजपच्या जागा २६ पर्यंत वाढतील, असा अंदाज वर्तवला होता. परंतु, आज प्रत्यक्ष निकाल समोर आल्यानंतर भाजपला अवघ्या ८ जागा मिळतील, असे दिसत आहे. तर ६२ जागांवर आम आदमी पक्षाचा विजय निश्चित मानला जात आहे.