नवी दिल्ली: औरंगाबादच्या करमाड गावानजीक शुक्रवारी सकाळी मालगाडीच्या धडकेत १६ मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. लॉकडाऊनमुळे अगोदरच पायपीट करण्याची वेळ ओढावलेल्या मजुरांचा अशाप्रकारे दुर्देवी मृत्यू झाल्याबद्दल देशभरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले आहे की, औरंगाबादमधील रेल्वे अपघातात मजुरांचा मृत्यू झाल्याचे ऐकून मला अतीव दु:ख झाले आहे. मी यासंदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्याशी बोललो असून ते परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत, असे मोदी यांनी सांगितले. तर रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्राथमिक माहितीनुसार, हे सर्व मजूर मध्य प्रदेशातील होते. जालन्याहून पाच ते सात तासांची पायपीट करून हे सर्वजण करमाड गावाजवळ पोहोचले होते. हे मजूर रेल्वे रुळांच्या बाजूने चालत होते. मात्र थकवा आल्याने त्यांनी आराम करायचे ठरवले. करमाडपासून औरंगाबाद स्थानक साधारण १५ किलोमीटर अंतरावर आहे. त्याठिकाणी जाण्यापूर्वी मजुरांनी रेल्वे रुळांवर काही तास विश्रांती घेण्याचे ठरवले.



अनेक तासांची पायपीट केल्याने हे सर्वजण गाढ झोपी गेले. त्यामुळे पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास मालगाडी आल्याचे त्यांना समजले नाही. त्यामुळे अनेकजण झोपेतच गाडीखाली चिरडले गेले. यावेळी रेल्वे रुळांच्या बाजूला झोपलेले मजूर सुदैवाने बचावले. मात्र, अंगावर काटा आणणारा हा प्रसंग पाहून या मजुरांना प्रचंड मानसिक धक्का बसला आहे. अपघातामध्ये एकजण गंभीर जखमी झाला आहे. या मजुरावर औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.