नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी रात्री देशात लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आणखी एक ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनच्या काळात देशात अत्यावश्यक वस्तू आणि औषधांची दुकाने सुरुच राहणार असल्याचा खुलासा केला आहे. केंद्र आणि राज्य सरकार याची पूर्णपणे खबरदारी घेईल. आपण सगळ्यांनी कोरोनाशी एकत्रपणे लढू आणि भारताला आरोग्यदायी ठेवू, असेही मोदींनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला उद्देशून भाषण केले. यावेळी त्यांनी कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी देशभरात २१ दिवसांच्या  लॉकडाऊनची घोषणा केली. हा २१ दिवसांचा कालावधी भारतासाठी निर्णायक असेल. या काळात आपण कोरोनाला रोखण्यात अपयशी ठरलो तर देश उद्ध्वस्त होईल. आपण २१ वर्ष मागे फेकले जाऊ, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला.




 


गेल्या काही दिवसांपासून राज्य पातळीवर लॉकडाऊन करूनही नागरिक परिस्थितीचे गांभीर्य समजून घ्यायला तयार नाहीत. अनेकजण बाजारपेठा आणि रस्त्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. त्यामुळे आता मोदींच्या सांगण्याने तरी या परिस्थितीत काही फरक पडणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.