नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भ्रष्टाचारी नंबर १ असे संबोधल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत राजीव गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली. नरेंद्र मोदी यांच्या या कृतीमुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या तीन टप्प्यांमध्ये नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्या काळात झालेल्या बोफोर्स गैरव्यवहाराचा मुद्दा उपस्थित करत त्यांना भ्रष्टाचारी नंबर १ असे संबोधले होते. काँग्रेसमधील काही खुशमस्कऱ्यांनी राजीव गांधी यांची प्रतिमा मिस्टर क्लीन अशी तयार केली होती. मात्र, त्यांचा अंत हा 'भ्रष्टाचारी नंबर वन’ म्हणूनच झाला होता, असे मोदींनी म्हटले होते. 


राजीव गांधींनी कौटुंबिक सहलीसाठी INS विराट वापरली; मोदींचा खळबळजनक आरोप


याशिवाय, राजीव गांधी यांनी पंतप्रधान असताना भारतीय नौदलाच्या आयएनएस विराट युद्धनौकेचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केल्याचा खळबळजनक दावाही मोदींनी केला होता. राजीव यांनी आपल्यासोबत परदेशी नागरिकांना युद्धनौकेवर नेऊन देशाच्या सुरक्षेशी खेळ केल्याची टीकाही मोदींनी केली होती. मात्र, माजी नौदलप्रमुख एल. रामदास यांनीही तत्कालीन घटनाक्रमाची तपशीलवार माहिती असलेले एक पत्रक प्रसिद्ध करून नरेंद्र मोदींचे सर्व आरोप फेटाळून लावले होते. राजीव गांधी यांनी आयएनएस विराटचा वापर कौटुंबिक सहलीसाठी केला नाही. अधिकृत शासकीय दौऱ्याच्यानिमित्ताने त्यांनी आयएनएस विराटवरून प्रवास केला होता. यावेळी त्यांच्यासोबत पत्नीशिवाय कुटुंबातील अन्य कुणीही सदस्य नव्हता, असे एल. रामदास यांनी स्पष्ट केले होते.


नरेंद्र मोदी यांच्या या विधानावर काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी जोरदार आक्षेप नोंदवला होता. मात्र, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी अत्यंत संयमी प्रतिक्रिया व्यक्त करत मोदींना प्रत्युत्तर दिले होते. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि माझ्याविषयी मोदी द्वेष पसरवत असतील, परंतु मी त्याची परतफेड प्रेमाने करेन, असे राहुल यांनी म्हटले होते.