राजीव गांधींनी कौटुंबिक सहलीसाठी INS विराट वापरली; मोदींचा खळबळजनक आरोप

गांधी कुटुंबाच्या मनोरंजनासाठी नौदलाला जुंपण्यात आले होते.

Updated: May 8, 2019, 09:59 PM IST
राजीव गांधींनी कौटुंबिक सहलीसाठी INS विराट वापरली; मोदींचा खळबळजनक आरोप title=

नवी दिल्ली: राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी कौटुंबीक सहलीसाठी आयएनएस विराटचा वापर केल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केला. दिल्लीत बुधवारी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी पुन्हा एकदा दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर निशाणा साधला. राजीव गांधी य़ांच्या सेवेसाठी सागरी गस्तीवर असलेली विराट युद्धनौका दहा दिवस अंदमान बेटांजवळ थांबवून ठेवली होती. एवढंच नाही तर गांधी कुटुंबाच्या मनोरंजनासाठी नौदलाला जुंपण्यात आले. याशिवाय, भारतीय नौदलाचे एक हेलिकॉप्टरही त्यांच्या सेवेत तैनात करण्यात आले होते. या सहलीत सोनिया गांधी यांच्या कुटुंबातील व्यक्तीही सहभागी झाल्याचा दावा मोदींनी केला. 

विदेशी लोकांना देशाच्या युद्धनौकेवर घेऊन जाणे हा देशाच्या सुरक्षेशी खेळ नव्हता का? केवळ राजीव गांधी यांच्या सासूरवाडीची मंडळी होती म्हणून त्यांना वेगळी वागणूक का देण्यात आली?, असा सवाल यावेळी मोदींनी उपस्थित केला. गांधी कुटुंबांनी आयएनएस विराटचा टॅक्सीसारखा वापर करून देशाचा अपमान केल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

नरेंद्र मोदींच्या या आरोपामुळे आता भाजप आणि काँग्रेसमधील वाकयुद्ध आणखी भडकण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांनी बोफोर्स घोटाळ्याचा दाखला देत राजीव गांधी यांचा शेवट 'भ्रष्टाचारी नंबर १' म्हणून झाल्याचे विधान केले होते. यानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती.