नवीन संसद भवनावर 20 फूट उंच आणि 9500 किलोचा अशोकस्तंभ, PM मोदींच्या हस्ते अनावरण
नवीन संसद भवन बवण्याचं काम सध्या जोरात सुरु आहे. हे नवं संसद भवन संपूर्णपणे हायटेक असणार आहे.
नवी दिल्ली : नवीन संसद भवनाचे काम जोरात सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नवीन संसद भवनाच्या छतावरील 20 फूट उंच अशोक स्तंभाचे अनावरणही केले. यावेळी त्यांच्यासोबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लाही उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाचा आढावा घेताना कामात गुंतलेल्या कामगारांशीही संवाद साधला आणि त्यांची प्रकृती जाणून घेतली. अशोकस्तंभाचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे वजन 9500 किलो आहे जे कांस्यापासून बनलेले आहे. त्याला आधारासाठी सुमारे 6500 किलो वजनाची स्टीलची आधारभूत रचना देखील तयार करण्यात आली आहे.
अशोक स्तंभाचे अनावरण करताना पंतप्रधान मोदी. ओम बिर्ला, हरिवंश नारायण सिंग आणि हरदीप पुरी उपस्थित होते. नवीन संसद भवनाच्या छतावरील अशोक स्तंभाचे प्रतीक आठ टप्प्यांच्या प्रक्रियेनंतर तयार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामावर आणखी 200 कोटी रुपये खर्च होऊ शकतात. स्टील, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर कामांवर हा खर्च वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. या वाढीव खर्चासाठी CPWD ला लोकसभा सचिवालयाची मंजुरी मिळणे अपेक्षित आहे.
जानेवारीत केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने (CPWD) संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामाच्या खर्चात वाढ करण्यासाठी लोकसभा सचिवालयाकडे मंजुरी मागितली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या वाढीनंतर संसद भवनाचे बजेट 1200 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
2020 मध्ये, नवीन संसद भवन बांधण्याचा प्रकल्पासाठी टाटा प्रोजेक्ट्सकडून 971 कोटी रुपयांचा बजेट देण्यात आला होता. सरकारने या इमारतीसाठी ऑक्टोबर 2022 ची अंतिम मुदत निश्चित केली होती आणि यावर्षी संसदेच्या नवीन इमारतीत हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याचे लक्ष्य ठेवले होते.
संसद भवनात आधुनिक ऑडिओ-व्हिडिओ व्हिज्युअल यंत्रणा बसवण्यात येणार आहे. याशिवाय सर्व खासदारांच्या टेबलवर टॅब्लेटची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच मंत्र्यांच्या दालनात आणि बैठकीच्या खोलीत हायटेक उपकरणांचा वापर केला जाणार आहे.