PNB बॅंक अफरातफर प्रकरण ; वित्त मंत्रालयाचा मोठा खुलासा
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बॅंक म्हणजे पंजाब नॅशनल बॅंक (PNB).
नवी दिल्ली : देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी दुसऱ्या क्रमांकाची बॅंक म्हणजे पंजाब नॅशनल बॅंक (PNB). या बॅंकेच्या मुंबई शाखेत तब्बल १.७७ अरब डॉलरचा (सुमारे ११,३३० कोटी रूपये) घोटाळा झाल्याचे समोर आले आहे. यावर वित्त मंत्रालयाने सांगितले की, हे प्रकरण नियंत्रणाबाहेर नसून यावर योग्य ती कारवाई केली जाईल. वित्तीय सेवा विभागाच्या संयुक्त सचिवांनी सांगितले की, मला वाटत नाही की, हे प्रकरण नियंत्रणाबाहेर आहे आणि यात काही चिंतेची बाब आहे.
बॅंकेने सांगितले की...
बॅंकेने सांगितले की, वसुलीसाठी हे प्रकरण विधी प्रर्वतन एजेंसींना पाठवण्यात आले आहे. त्यामुळे दोषींविरोधात कायदेशीर कारवाई होईल. बॅंक पारदर्शक आणि स्वच्छ बॅंकींगसाठी बांधिल आहे. असे जरी असेल तरी गेल्या दहा दिवसात बॅंकेचा हा दुसरा घोटाळा समोर आला आहे. यापूर्वी ५ फेब्रुवारीला सीबीआय सीबीआयने अरबपती हिरे व्यावसायिक नीरव मोदी, त्यांची पत्नी, भाऊ आणि भागिदारी व्यावसायिक यांचा पीएनबीसोबतचा २८०.७० कोटी रुपयांचे फसवणूकीचे प्रकरण समोर आले होते.
अनधिकृत ट्रांजेक्शन
पीएनबीच्या मुंबई ब्रॉंचचे प्रकरण अनधिकृत ट्रांजेक्शनशी संबंधित आहे. यामुळे काही ठराविक अकाऊंट होल्डर्संना फायदा मिळत होता. बॅंकेने याची माहिती स्टॉक एस्चेंज विभागाला (BSE) दिली आहे. या फसवणूकीचा परिणाम इतर बॅंकावरही पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. बॅंकेची अंतर्गत यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहे.
कारवाई लवकरच
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींची चौकशी होईल आणि त्यानुसार लवकरात लवकर कारवाईचा निर्णय घेण्यात येईल.
पीएनबीचा शेअर १० टक्क्यांनी घसरला
बॅंकेत झालेल्या या अफरातफरीत थेट कोणत्याही व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. याचा परिणाम शेअर बाजारावरही झालेला दिसून आला. पीएनबीचे शेअर्स १०.३९ टक्क्यांनी घसरले आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे ३००० कोटींहुन अधिक रुपये बुडाले आहेत. बुधवारी सुरूवातीला व्यवहार सुरू झाला तेव्हा पीएनबीचा शेअर ५.७ टक्क्यांनी घसरला.