Delhi Murder News: दिल्लीमध्ये (Delhi) 31 मे रोजी झालेल्या दुहेरी हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपी हे चुलत भाऊ असून यामधील एकजण संगणक प्रशिक्षक आणि दुसरा संगीत दिग्दर्शक आहे. दोघांनीही कृष्ण नगर येथे 64 वर्षीय महिला आणि तिच्या मुलीची हत्या करत ऐवज लुटला होता. पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असता काही धक्कादायक खुलासे झाले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी श्रीमंत होण्याच्या हेतूने केलेल्या या गुन्ह्याला 'मिशन मालामाल' (Operation Malamal) असं नाव दिलं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

किशन (Kishan) आणि अंकित कुमार सिंग (Ankit Kumar Singh) अशी आरोपींची नावं असून, दोघेही बिहारचे रहिवासी आहेत. किशन हा दिल्लीत लक्ष्मीनगरमध्ये वास्तव्यास होता. अंकित कुमार सिंग हा गायक असून, त्याचा म्युझिक बँड आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या एका चित्रपटासाठी तो गीतकार आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडणार होता. 


31 मे रोजी पोलिसांना कृष्णनगर येथे राजराणी आणि त्यांची 39 वर्षीय मुलगी गिन्नी किरार यांचा अत्यंत सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गुन्हा करण्याआधी दोन वकिलांशी संवाद साधला होता. 


दोन्ही आरोपी एका वेब सीरिजमुळे गुन्हा करण्यास प्रवृत्त झाले होते असा संशय आहे. या वेब सीरिजमध्ये त्यांना पोलीस नेमकं कसं काम करतात याची माहिती मिळाली होती. पण सध्या तपास सुरु असल्याने याबाबत छातीठोकपणे सांगू शकत नाही असं पोलीस म्हणाले आहेत. 


बुधवारी एका व्यक्तीने रात्री 7 वाजून 56 मिनिटांनी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरातून दुर्गंध येत असल्याचा फोन केला होता. यानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असता त्यांना राजराणी आणि गिन्नी यांचा मृतदेह आढळला होता. राजराणी यांनी आकाशवाणीत काम केलं होतं. तसंच त्या तबलावादक होत्या. त्यांची मुलगी गिन्नील बोलण्याची आणि ऐकण्याची समस्या होती. घरात या दोघीच राहत होत्या. 


गिन्नीला अजून दोन बहिणी आहेत, ज्या वेगळ्या राहतात. गिन्नीच्या वडिलांचं निधन झालं आहे. राजराणी यांनी ऑनलाइन सर्च केल्यानंतर तिला शिकवण्यासाठी शिक्षक नेमले होते. यामधील किशन सिंग होता. किशन तिला संगणक शिकवत होता. 


किशनने गिन्नी शिकवणी देताना राजराणी यांच्या बँक खात्यात लाखो रुपये असल्याचं पाहिलं होतं. तसंच घऱातही मोठी रक्कम असावी असा त्याचा अंदाज होता. यानंतर किशनने दोघींची हत्या करण्याची योजना आखली. या कटात सहभागी होण्यासाठी किशनने आपला मित्र अंकित कुमार याला बोलावून घेतलं. त्याला पैशांचं आमिष देत त्याने हत्येसाठी तयार केलं. त्यानेच अंकितचं तिकीट बूक केलं. यानंतर दोघांनी अनेक दिवस घराची रेकी केली आणि नंतर संधी मिळतात दोघींची हत्या केली. 


दोन्ही आरोपींनी आई आणि मुलीची हत्या केल्यानंतर घऱात ठेवलेला अॅप्पल लॅपटॉप, महागडी घड्याळं, 50 ते 60 हजारांची रोख रक्कम आणि अन्य महागडं सामान लुटून पळ काढला होता. दुर्गंध येत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी येऊन पाहिलं असता दोघींची गळा दाबून हत्या करण्यात आली होती. 


WhatsApp वर बनवला होता ग्रुप


आरोपींनी घरात खूप सारी रोख रक्कम आणि दागिने असावेत असं वाटलं होतं. पण त्यांच्या हाती फार काही लागलं नाही. पोलिसांनी 200 हून अधिक सीसीटीव्ही तपासल्यानंतर आरोपी किशन सिंह याची माहिती मिळवली होती. पोलिसांनी लक्ष्मीनगरमधील त्याच्या घरी जाऊन चौकशी केली असता हत्येचा उलगडा झाला. 


पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. दोन्ही आरोपींनी हत्येसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला होता, ज्याचं नाव 'ऑपरेशन मालामाल' (Operation Malamal) असं ठेवण्यात आलं होतं. पोलिसांनी आरोपींकडून लुटलेला माल आणि रोख रक्कम जप्त केली आहे. 


आरोपी अंकितने पोलिसांना सांगितलं आहे की, त्याने आगामी एका ओटीटी चित्रपटासाठी गाण गायलं आहे. एका भोजपुरी चित्रपटात त्याने गाणं गायलं आहे. लवकर पैसे कमावण्याच्या नादात  आपण भावासह मिळून हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे.