`दिलीप डॉक्टर साहब के...`; कागदावरील `त्या` 7 शब्दांमुळे वर्षभराने सापडला खूनी
Crime News: पोलिसांना सडलेल्या अवस्थेत सापडलेल्या या मृतदेहाच्या आजूबाजूला कोणताही पुरावा सापडला नाही. केवळ एक कागदाचा तुकडा मृतदेहाच्या बाजूला होता ज्यावर 7 शब्द लिहिण्यात आलेले.
Crime News: उत्तर प्रदेशमधील कानपूर पोलिसांनी एका गूढ हत्येच्या प्रकरणाचा अगदी फिल्मी स्टाईलने तपास पूर्ण केला आहे. जवळपास एका वर्षानंतर या हत्या प्रकरणामधील आरोपीला पोलिसांनी केवळ एका कागदी तुकड्यावरील काही शब्दांच्या आधारे अटक केली आहे. मागील वर्षभरापासून कानपूर पोलिसांना या अनोखळी मृतदेहाची ओळखही पटत नव्हती. पोलिसांना हा मृतदेह सापडला तेव्हा मृतदेहाच्या आजूबाजूला एकही पुरावा सापडला नाही. या मृतदेहाच्या बाजूला एक कागदाचा तुकडा सापडला ज्यावर, 'दिलीप डॉक्टर साहब के बगल मे बांदा' असं लिहिलेलं होतं. याच एका वाक्याच्या आधारे कोणताही पुरावा नसताना पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले.
कोणताच पुरावा नाही
कानपूरमध्ये 15 नोव्हेंबर 2022 रोजी सैनपारा परिसरामध्ये एक अज्ञात मृतदेह सापडला होता. हा मृतदेह पूर्णपणे सडला होता. त्यामुळे त्याची ओळखही पटत नव्हती. पोलिसांनी शहरामध्ये कोणी बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवण्यात आली आहे का हे तपासलं. मात्र अशी कोणतीही तक्रार सापडली नाही. अनेकांना या मृतदहेचा फोटो दाखवण्यात आला मात्र कोणीही या व्यक्तीला ओळखलं नाही. त्यामुळे या ब्लॅक मर्डर प्रकरणाचा तपास वरिष्ठांनी हाती घेतला. अखेर घाटमपूरचे पोलीस निरिक्षक अशोक शुक्ला यांनी स्वत: घटनास्थळी जाऊन तपासणी केली. मात्र त्यांना त्या ठिकणी कोणताही पुरावा सापडला नाही तर त्या कागदाच्या तुकड्याच्या मदतीने आरोपीचा शोध सुरु केला.
त्या एका ओळीने सुरु केला तपास
पोलिसांच्या अनेक तुकड्या तयार करण्यात आल्या. मृतदेहाची ओळख पटवण्याचं आव्हान पोलिसांसमोर होतं. मृतदेहाजवळ सापडलेल्या कागदाच्या तुकड्याव बांदा येथील दिलीपचा उल्लेख होता. हा दिलीप नावाचा इसम एखाद्या डॉक्टरच्या आजूबाजूला राहत असल्याचं कागदाच्या तुकड्यावरील 'दिलीप डॉक्टर साहब के बगल मे बांदा' या 7 शब्दांच्या ओळीवरुन स्पष्ट होत होते. मात्र नेमका डॉक्टर कोणता, हा दिलीप कोण याची उत्तरं पोलिसांना शोधायची होती. पोलिसांनी बांदा येथे जाऊन तपास सुरु केला.
100 डॉक्टरांची चौकशी
बांदामध्ये जवळपास 100 डॉक्टर आहेत. त्यांची चौकशी केली. त्यांच्या आजूबाजूला कोणी दिलीप राहतो का विचारण्यात आलं. मात्र हाती काहीच लागलं नाही. अखेर पोलीस अजून काय करता येईल यासंदर्भातील इतर पर्याय चाचपडत असतानाच अतर्रा येथील बबेरु रोड येथे राहणाऱ्या एका डॉक्टरजवळ तपास करत असतानाच पोलिसांना पहिला धागा सापडला. डॉक्टरच्या इथे बसलेल्या एका व्यक्तीने स्वत:चं नाव राम प्रसाद असल्याचं सांगितलं. त्याचं दुकान डॉक्टरच्या क्लिनिकच्या बाजूलाच होतं.
...अन् मृतदेहाची ओळख पटली
रामने माझ्या भावाचं नाव दिलीप असल्याचं सांगितलं. तसेच मागील काही दिवसांपासून दिलीप बेपत्ता असल्याचंही राम म्हणाला. पोलिसांनी भाऊ बेपत्ता असल्याची तक्रार का केली नाही असं विचारलं असता तो अनेकदा अशापद्धतीने निघून जातो आणि काही दिवसांनी परत येतो. त्यामुळे तक्रार केली नाही असं रामने सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी रामला मृतदेहाचा फोटो दाखवला असता तो रामचा भाऊ दिलीप असल्याची माहिती समोर आली. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर दिलीपबरोबर नेमकं काय घडलं हे पोलिसांनी जाणून घेण्यासाठी तपास सुरु केला.
मोबाईल लोकेशनवरुन झाला खुलासा
तपासादरम्यान पोलिसांना दिलीपचा शिव शंकर नावाच्या मित्राबद्दल समजलं. दिलीपने शिव शंकरला 50 हजार रुपये उधार दिले होते, अशी माहितीही समोर आली. पोलिसांनी चौकशी केली असता शिव शंकरने उधार पैसे घेतल्याचं मान्य केलं पण हत्या केली नाही असं सांगितलं. त्यानंतर पोलिसांनी शिव शंकरचा भाऊ सुशीलबद्दल शंका वाटू लागली. पोलिसांनी 15 नोव्हेंबर 2022 रोजी सुशीलच्या मोबाईल लोकेशनची माहिती काढली. ज्या ठिकाणी सुशील 14 नोव्हेंबरच्या रात्री होता तिथून काही अंतरावरच दिलीपचा मृतदेह सापडला होता. दिलीपचा मृत्यू होण्याआधी तो या 2 भावांबरोबर शेवटचा पाहिला गेला होता हे पोलिसांना तपासामध्ये समजलं.
पोलिसांनी अटक केली अन्...
पोलिसांनी मंगळवारी शिव शंकर आणि सुशीलला अटक केली. दोघांना पोलिसी खाक्या दाखवण्यात आल्यानंतर त्यांनी 50 हजार रुपये दिलीपला द्यावे लागू नयेत म्हणून त्याची हत्या आम्हीच केल्याचं मान्य केलं. कोणाला शंका येऊ नये म्हणून कानपूरमध्ये फिरण्याच्या बहाण्याने दिलीपला आणलं आणि तिथेच त्याची हत्या केली.