नवी दिल्ली :  केंद्र सरकारने कोरोनाच्या वाढत्या फैलावामुळे संपूर्ण देश लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. या काळात धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांसह इतर कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसल्याचं जाहीर केलं होतं. तरी देखील दिल्लीत तबलिगी जमातचा मेळावा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मुस्लीम भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामुळे पोलीस आता त्यांच्या मोबाईल फोनच्या डेटावरून त्यांचा शोध घेणार असल्याचं समजत आहे.  सूत्रांच्या माहितीनुसार गुन्हे शाखेने मरकजमधील  मार्च महिन्याचा संपूर्ण  डेटा फोन कंपनीकडून  मागवला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या माहितीच्या आधरावर पोलिसांची शोध मोहिम सुरू आहे. निजामुद्दीनमधल्या तबलिगी जमातच्या कार्यक्रमाने दिल्ली हादरली आहे. या कार्यक्रमाने अनेकांना कोरोना झाल्याचे पुढे आले. तर काही जणांचा मृत्यू झाला. काहीवर आयसोलेशन  वॉर्डमध्ये उपचार सुरू आहेत. 


मरकजमध्ये आलेल्या लोकांमुळे कोरोना रुग्ण वाढण्याची भीती
दिल्लीत एकूण ४४५ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तर राजधानी दिल्लीत येत्या काळात आणखी कोरोनाग्रस्त रुग्ण सापडण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. याचा खुलासा खुद्द मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केला आहे. 


मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले, 'मरकजमधून तब्बल २ हजार ३०० लोकांना  बाहेर काढण्यात आले आहे. त्यापैंकी ५०० जणांमध्ये कोरोनाची लक्षणं असल्याचं निदर्शनास आले आहे. त्यामुळे त्यांना तात्काळ रुग्णालयात  उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.'  यांमध्ये अनेक जण कोरोना बाधित असल्याचं देखील त्यांनी सांगितले आहे.