हा एक ई-मेल वाचला असता तर टळला असता अमृतसर रेल्वे अपघात
चौकशीत धक्कादायक माहिती आली समोर
नवी दिल्ली : दसऱ्याच्या दिवशी अमृतसरमध्ये झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणाची चौकशी जीआरपीला सोपवण्यात आली आहे. जीआरपीच्या चौकशीत असं समोर आलं की, 18 आणि 19 ऑक्टोबरच्या मध्यरात्री 12:53 वाजता पोलीस आयुक्त कार्यालयाने रेल्वे पोलिसांना आणि सगळ्या पोलीस स्थानकांना दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेचे य़ोग्य ते पाऊलं उचलण्यासाठी ईमेल केला होता.
ई-मेलबाबत अधिकारी गप्प
या मेलमध्ये सुरक्षेच्या दृष्टीकोनातून योग्य त्या उपाययोजना करण्यासाठी प्रत्येक ठिकाणींची माहिती देखील दिली गेली होती. जेथे पोलिसांना सुरक्षेसाठी तैनात करण्यास सांगितलं होतं. पण आता यावर बोलण्यासाठी कोणताच पोलीस अधिकारी तयार नाही. जीआरपीच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं की, 'जर पोलीस प्रशासनाच्या या ईमेलकडे अधिकाऱ्यांनी गंभीररित्या पाहिलं असतं तर इतका मोठा रेल्वे अपघात झाला नसता.'
स्टेशन मास्टरला दिली होती माहिती
जालंधर-अमृतसर रेल्वे ड्रायवरने हा अपघातानंतर पुढच्या स्टेशनच्या स्टेशन मास्टरला या अपघाताची माहिती दिली. ड्राईव्हरचा जबाब देखील चौकशी करणारे अधिकारी नोंदवत आहेत. या घटनेनंतर जालंधर-अमृतसर (पठानकोट सह) मार्गावरील रेल्वे वाहतूक बंद करण्यात आली आहे.
15 सेकंदमध्ये अनेकांचा मृत्यू
दसऱ्याच्या दिवशी जवळपास 700 लोकं रावण दहण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. जवळपास 10 ते 15 सेकंदमध्ये अचानक येथे हाहा:कार झाला. लोकांच्या ओरडण्याचे आवाज येऊ लागले. अनेकांना रेल्वेच्या हॉर्नचा आवाज देखील ऐकू आला नाही. कारण त्यावेळी तेथे फटाक्यांचा आवाज होता. या अपघातात 62 जणांचा मृत्यू झाला होता.