Karnataka : काँग्रेस विजयानंतर राजकीय घडामोडींना वेग; सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांना दिल्लीला बोलवले
Karnataka Election Result : कर्नाटकात सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आणि भाजपला पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे काँग्रेसच्या बाजुने निकाल लागणार हे स्पष्ट झाले. दरम्यान, कर्नाटकात ऑपरेशन लोटस रोखण्यासाठी काँग्रेस आतापासूनच सावध झालीय. ऑपरेशन कमळ रोखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी रणनीती आखली आहे.
Karnataka Election Result : कर्नाटकात काँग्रेसनं विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याकडे लक्ष लागले आहे. माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी के शिवकुमार यांची नावे आघाडीवर आहेत. दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार चुरस आहे. विजयानंतर दोघांनाही दिल्लीला पाचरण करण्यात आले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदावर कुणाची वर्णी लागणार याकडे देशाचं लक्ष लागले आहे. कर्नाटकात सुरुवातीच्या कलांमध्ये काँग्रेसने मुसंडी मारली आणि भाजपला पिछाडीवर टाकले होते. त्यामुळे काँग्रेसच्या बाजुने निकाल लागणार हे स्पष्ट झाले.
ऑपरेशन लोटस रोखण्यासाठी काँग्रेस सावध
कर्नाटकात ऑपरेशन लोटस रोखण्यासाठी काँग्रेस आतापासूनच सावध झालीय. ऑपरेशन कमळ रोखण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष खरगेंनी रणनीती आखलीय. सगळ्या आमदारांना विजयानंतर तातडीने बंगळुरूत येण्याचे आदेश देण्यात आलेत. काँग्रेस विजयी आमदारांना बंगळुरूत ठेवणार आहे. त्यासाठी काँग्रेसने चॉपर, चार्टर विमानांचा ताफाही सज्ज ठेवला.
खरगे यांच्या नेतृत्वात उद्या काँग्रेस संसदीय पक्षाची उद्या बंगळुरुत बैठक होणार आहे. कर्नाटकात सत्तास्थापनेसंदर्भात मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी, के. सी वेणुगोपाल आणि रणदीप सुरजेवाला कर्नाटकच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. तसंच काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला तयार झाल्याचंही समजते आहे. काँग्रेस मुख्यमंत्रिपद देणार विभागून देणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. आधी सिद्धरामय्या मुख्यमंत्री होणार त्यानंतर डी. के. शिवकुमार मुख्यमंत्री होणार आहेत.
कर्नाटक हे काँग्रेसचे एकमेव राज्य
कर्नाटक राज्य पुन्हा एकदा काँग्रेसच्या हाती आले आहे. भाजपचं कमळ कर्नाटकात कोमेजले. कर्नाटक जिंकण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावणाऱ्या भाजपचा, पंतप्रधान मोदी, अमित शाह यांचा करिष्मा चालला नाही. कर्नाटकात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ताकद पणाला लावली होती. काँग्रेस नेते सिद्धरामय्या आणि प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार आणि काँग्रेस अध्यक्ष खरगे हे विजयाचं समीकरण ठरले. लिंगायत समाजाला आरक्षणाच्या आश्वासनाचा फारसा फरक पडला नाही हे आजच्या निकालांनी दाखवून दिले. कर्नाटकच्या रुपात भाजपने दक्षिणेतलं एकमेव राज्यही गमावले. तर दक्षिणेत एकहाती सत्ता मिळवलेलं कर्नाटक हे काँग्रेसचं एकमेव राज्य ठरले आहे.
बेळगावातही काँग्रेसने भाजपला दिला धोबीपछाड
बेळगावातही काँग्रेसने भाजपला धोबीपछाड दिलाय. काँग्रेसनं 11 तर भाजपने 7 जागांवर विजय मिळवलाय. महाराष्ट्र एकीकरण समितीचा तर सपशेल पराभव झालाय. पाच पैकी एकही जागा एकीकरण समितीला जिंकता आलेली नाही. काँग्रेसच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात जल्लोष केला. दरम्यान, कर्नाटक विजयानंतर प्रियंका गांधींनी मंदिरात पूजा केली. प्रियंका गांधी सिमल्यामध्ये आहेत. तिथल्या जाखू हनुमान मंदिरात प्रियंका गांधींनी पूजा केली आणि देशातल्या तसंच कर्नाटकातल्या जनतेच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना केल्याचं प्रियंका गांधींनी सांगितले.
कर्नाटकातील विधानसभा 2019 च्या निवडणुकीनंतर सत्तास्थापनेसाठी राजकीय नाट्य घडलं होते. महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकार सत्तेवर आले त्याचप्रमाणे कर्नाटकतही भाजपाने सत्ता स्थापन केली होती. याच मुद्द्यावरून काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी भाजपावर टीका केली आहे. 'ज्या पापातून कर्नाटक सरकारची निर्मिती झाली, तीच गोष्ट महाराष्ट्राला लागू होते', असे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.