शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर मोदींचा चेहरा लावल्याने वाद
या क्लीपमध्ये चित्रपटातील संवादही बदलण्यात आले आहेत.
नवी दिल्ली: दिल्लीत राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. या निवडणुकीत भाजपच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करण्यात आली आहे. पोलिटिकल कीडा या ट्विटर हँडलवरून तान्हाजी या चित्रपटातील एक सीन शेअर करण्यात आला आहे.
मात्र, यामध्ये मॉर्फिंग तंत्रज्ञानाचा वापर करून शिवाजी महाराजांच्या चेहऱ्यावर नरेंद्र मोदी यांचा चेहरा लावण्यात आला आहे. तर केजरीवाल यांना उदयभान राठोड म्हणून दाखवण्यात आले आहे. या क्लीपमध्ये चित्रपटातील संवादही बदलण्यात आले आहेत. शाहीन बाग से उन्होंने वोट बँक की राजनिती शुरू की है, आखरी दांव हम खेलेंगे, असे संवाद मोदींच्या तोंडी घालण्यात आले आहेत. तर अमित शहा हे तानाजी मालुसरे यांच्या वेशात दाखवण्यात आले आहेत. ही चित्रफीत भाजपच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून शेअर करण्यात आलेली नाही. तरीही या वादग्रस्त क्लीपमुळे महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता आहे.
काही दिवसांपूर्वीच भाजप नेते जय भगवान गोयल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे. जय भगवान गोयल यांनी नरेंद्र मोदी यांची महती सांगणारे पुस्तक लिहले आहे. या पुस्तकाचे शीर्षक 'आज के शिवाजी - नरेंद्र मोदी' असे ठेवण्यात आले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी संतप्त झाले होते. बराच गदारोळ झाल्यानंतर अखेर हे पुस्तक मागे घेण्यात आले होते.